पुणे :मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान आंदोलकाचा मृत्यू झाला. यामध्ये सरकारचा निष्काळजीपणा आहे. त्यामुळे त्याविरुद्ध राष्ट्रीय व राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी ही तक्रार कायदेशीर मानवाधिकार आयोगाकडे केली आहे.
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान शनिवारी (दि. ३०) आझाद मैदान, मुंबई येथे अहमदपूर तालुक्यातील (जि. लातूर) विजय घोगरे यांचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात ही तक्रार ॲड. मनोज आखरे यांनी ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांच्या मार्फत केली आहे. तक्रारीत नमूद आहे की, शासन आणि प्रशासन आंदोलनादरम्यान पिण्याचे पाणी, शौचालय व स्वच्छता सुविधा, वैद्यकीय मदत व ॲम्ब्युलन्स सेवा, पावसापासून किंवा इतर हवामानापासून संरक्षण, विजेची व अन्य मूलभूत सुविधा अशा आवश्यक सुविधा पुरविण्यास अपयशी ठरले. महाराष्ट्र सरकारला व प्रशासनाला आंदोलनाची अगोदरच माहिती होती तसेच मुंबई उच्च न्यायालयात परवानगीसाठी अर्जही होता. तरीही, सरकारकडून आंदोलनकर्त्यांचे आरोग्य आणि सुरक्षेची योग्य खबरदारी घेतली गेली नाही. यामुळे घटनेतील कलम २१ नुसार (जीवनाचा अधिकार) कलम २१ची स्पष्ट हानी झाली असून, राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे हा दुर्दैवी मृत्यू घडला आहे.
कै. घोगरे यांच्या मृत्यूच्या परिस्थितीची सखोल चौकशी केली जावी. जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय कारवाई केली जावी. मृतकांच्या कुटुंबाला योग्य नुकसानभरपाई / आर्थिक मदत दिली जावी. भविष्यातील आंदोलनादरम्यान, सभा किंवा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पाणी, शौचालय, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा तत्काळ उपाय अनिवार्य करण्यात यावेत, अशा मागण्यादेखील करण्यात आल्या आहेत. ही तक्रार सामाजिक न्यायासाठी दाखल करण्यात आली असून, महाराष्ट्र सरकार व प्रशासनाचा अक्षम्य निष्काळजीपणा आणि घटनेतील कलम २१ च्या उल्लंघनासाठीची जबाबदारी घ्यावी, अशी विनंती या याचिकेत आयोगाकडे करण्यात आली आहे.