बावधन परिसरातील पाण्यात ‘कॉलीफॉर्म’ जीवाणू ; पाण्याचे १२ नमुने दूषित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 17:48 IST2025-10-12T17:47:58+5:302025-10-12T17:48:14+5:30
- महापालिका आरोग्य विभागाकडून तातडीने कारवाई ; नागरिकांना उकळून पाणी पिण्याचा सल्ला

बावधन परिसरातील पाण्यात ‘कॉलीफॉर्म’ जीवाणू ; पाण्याचे १२ नमुने दूषित
पुणे : बावधन परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये आरोग्यास अपायकारक ठरणारा ‘कॉलीफॉर्म’ जीवाणू आढळून आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने घेतलेल्या ९३ पाण्याच्या नमुन्यांपैकी १२ नमुने दूषित असल्याचे निष्पन्न झाले. १४ नमुन्यांमध्ये क्लोरीनचे प्रमाण अत्यल्प आढळले आहे.
गेल्या काही दिवसांपासून गुंडे वस्ती, पाटील नगर, जाधव वस्ती आणि गावठाण परिसरातील रहिवाशांमध्ये पोटदुखी, उलट्या आणि अतिसार यांसारख्या तक्रारी वाढल्याने आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. या परिसरात आतापर्यंत पोटासंदर्भातील आजाराचे ११० रुग्ण नोंदवले गेले असून त्यापैकी काहींवर घरीच उपचार सुरू आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने ६ हजार ४६० घरांची तपासणी पूर्ण केली असून, २३ हजार २७० नागरिकांपर्यंत आरोग्य जनजागृती मोहिमेद्वारे माहिती पोहोचवली आहे. प्रभावित भागातील नागरिकांना शुद्ध बाटल्यांचे पाणी आणि ‘मेडिक्लोअर’ शुद्धीकरण बाटल्या वाटप केल्या. तसेच पाणीपुरवठा वाहिन्यांमध्ये क्लोरीन टाकण्याचे प्रमाण वाढवण्यात आले असल्याची माहिती आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली.
‘कॉलीफॉर्म’ हा जीवाणूंचा एक समूह असून तो प्रामुख्याने मानव आणि प्राण्यांच्या मलमूत्रामध्ये आढळतो. अशा जीवाणूंची उपस्थिती पाण्यातील मलमूत्र मिश्रणाचे संकेत देते. त्यामुळे हा जीवाणू आढळल्याने प्रभावित परिसरात होणारा पाणीपुरवठा दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या घटनेमुळे पुण्यातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यात सिंहगड रस्ता परिसरातही दूषित पाण्यामुळे अतिसार व उलट्यांचे रुग्ण वाढले होते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असून, नागरिकांना “पाणी उकळूनच पिण्याचा” सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
‘कॉलीफॉर्म’ जीवाणूंमुळे पचनसंस्थेचे विकार
‘कॉलीफॉर्म’ हे जीवाणू मुख्यत्वे मानव व प्राण्यांच्या मलमूत्रातून पाण्यात मिसळतात. अशा दूषित पाण्याचे सेवन केल्यास पोटदुखी, उलट्या, अतिसार, ताप, मळमळ आणि पचनसंस्थेचे विकार अशी लक्षणे दिसून येतात. काही प्रकरणांमध्ये ‘इ–कोलाय’ प्रकारातील जीवाणूंमुळे रक्तमिश्रित अतिसार तसेच मूत्रपिंड निकामी होण्यासारखे गंभीर दुष्परिणामही संभवतात.
‘जीबीएस’ नंतर आता ‘कॉलीफॉर्म’
या वर्षी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सिंहगड रस्ता परिसरात दूषित पाण्यामुळे अतिसार, जुलाब, उलट्या याचे रुग्ण आढळले होते, तर त्यापाठोपाठ ‘जीबीएस’ रुग्णांची वाढ झाल्याचे आढळून आले होते. आता बावधन परिसरात पाण्यात ‘कॉलीफॉर्म’चा जिवाणू आढळल्याने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी आणि सार्वजनिक आरोग्याबाबतचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
बाधित परिसरातील नागरिकांना शुद्ध बाटल्यांचे पाणी वाटप करण्यात आले आहे. पाणीपुरवठा वाहिन्यांमध्ये क्लोरिन टाकण्याची प्रक्रिया देखील वाढवण्यात आली असून, पाण्याचे शुद्धीकरण करणाऱ्या मेडिक्लोअर बाटल्यांचे वाटप केले. - डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख