सावधान..! सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले; साथरोगांचाही धोका; काळजी घेण्याचे आरोग्यतज्ज्ञांकडून आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 13:51 IST2025-09-28T13:51:01+5:302025-09-28T13:51:42+5:30
मे अखेरपासून टप्प्याटप्प्याने पडणारा पाऊस, कधी दमट तर कधी थंड हवामान यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

सावधान..! सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले; साथरोगांचाही धोका; काळजी घेण्याचे आरोग्यतज्ज्ञांकडून आवाहन
पुणे :पुणे शहरात सध्या सर्दी, खोकला व तापाने त्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हवामानातील बदल, सततचे पावसाळी वातावरण, पाणी साचल्यामुळे निर्माण झालेली अस्वच्छता आणि प्रदूषणामुळे विविध प्रकारचे साथरोग डोके वर काढत आहेत. शहरातील खासगी दवाखान्यांपासून ते सरकारी रुग्णालयांपर्यंत रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याभरात शेकडो नागरिकांना सर्दी-खोकल्यासह तापाची लक्षणे दिसून आली आहेत. लहान मुले, वयोवृद्ध आणि कमी प्रतिकारशक्ती असलेले रुग्ण यांना विशेषत: याचा फटका बसत आहे. याशिवाय डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रोएंटेरायटिससारख्या पावसाळी आजारांचीही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मे अखेरपासून टप्प्याटप्प्याने पडणारा पाऊस, कधी दमट तर कधी थंड हवामान यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
हवामानातील या अनिश्चिततेमुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊन संसर्गजन्य विषाणूंचा प्रसार झपाट्याने होत आहे. लहान मुलांमध्ये शारीरिक ताकद कमी असल्याने त्यांच्यावर याचा अधिक दुष्परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, घशात खवखव आणि श्वास घेण्यास त्रास ही या आजारांची सुरुवातीची चिन्हे असून, ती तीन दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. शाळकरी मुले व वृद्धांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. शाळांमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा व स्वच्छतागृहांच्या देखभालीवर भर देण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. दरम्यान, ससून रुग्णालय व महापालिका रुग्णालयांनी संसर्गजन्य आजारांवर उपचारासाठी स्वतंत्र वाॅर्ड उपलब्ध करून दिले असून नागरिकांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता रूग्णालयात उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काय काळजी घ्यावी?
साबणाने वारंवार हात धुणे, खोकताना-शिंकताना रुमाल अथवा टिश्श्यूचा वापर करावा. उकळलेले, स्वच्छ पाणीच पिणे; उघड्यावरचे व अस्वच्छ अन्न टाळणे. घराभोवती पाणी साचू देऊ नये; डासांपासून बचावासाठी रिपेलंट्स, मच्छरदाणीचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी व गर्दीत मास्क वापरावा. पुरेशी झोप, संतुलित आहार आणि वेळेवर औषधोपचार घ्यावेत.
सर्दी, खोकला आणि ताप मुख्यत्वे व्हायरल स्वरूपाचा असल्याने संसर्ग पसरतो आहे. मात्र पावसात साचणाऱ्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया तर दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोसारख्या साथरोगांचा प्रसार संभवतो. डासांपासून बचाव करणे, उकळून थंड केलेले पाणी पिणे, वाफ घेणे, हलका व पौष्टिक आहार घेणे, आदी उपाय प्रभावी ठरतात. मात्र, ताप तीन दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास, श्वसनास अडचण किंवा छातीत दुखणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. - डॉ. राहुल ठाकूर, ईएनटी तज्ज्ञ, ससून रुग्णालय.