राज्यातील पहिलाच उपक्रम; नागरिकच बनणार पोलिसांचे ‘सीसीटीव्ही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 15:22 IST2025-04-17T15:21:25+5:302025-04-17T15:22:50+5:30

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ‘ट्राफिक बडी’ यंत्रणा लवकरच होणार कार्यान्वित

pune news Citizens will become the police's CCTV Pimpri-Chinchwad Police to soon implement 'Traffic Buddy' system | राज्यातील पहिलाच उपक्रम; नागरिकच बनणार पोलिसांचे ‘सीसीटीव्ही’

राज्यातील पहिलाच उपक्रम; नागरिकच बनणार पोलिसांचे ‘सीसीटीव्ही’

पिंपरी : वाहतूक कोंडी, खराब रस्ते, सिग्नल यंत्रणा बंद, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, अस्ताव्यस्त पार्किंग अशा तक्रारी नागरिकांना आता थेट वाहतूक पोलिसांना करता येणार आहेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवडपोलिसांनी ‘ट्राफिक बडी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. ८७८८६४९८८५ या क्रमांकावरून नागरिकांना वाहतुकीशी संबंधित तक्रारी करता येणार आहेत.

या उपक्रमाची लवकरच अंमलबजावणी सुरू केली जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर ऑनलाईन चलन करणे सुलभ होणार आहे. नागरिकच पोलिसांचे सीसीटीव्ही म्हणून काम करतील, असा विश्वास आयुक्त चौबे यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण, ट्राफिक बडी, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयोजन (ॲप) याबाबतची माहिती देण्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद झाली. अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, स्वप्ना गोरे, विशाल गायकवाड, डॉ. शिवाजी पवार, बापू बांगर उपस्थित होते.

रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भातील माहिती संबंधित शासकीय संस्थेकडे पाठविण्यात येईल. त्यानंतरही रस्ता न दुरुस्त झाल्यास महिन्याच्या अखेरीस पुन्हा पाठपुरावा केला जाईल. संबंधित संस्थेशी समन्वय साधून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या माध्यमातून सातत्याने तक्रारी येणारी ठिकाणे निदर्शनास येतील. त्यावर तोडगा काढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतली जाईल. याबाबतची नियमावली तयार आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे आयुक्त चौबे यांनी सांगितले.


‘ट्राफिक बडी’चा असा करता येईल वापर

‘ट्राफिक बडी’साठी कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही. ही सुविधा ८७८८६४९८८५ या व्हाट्सॲप क्रमांकावर उपलब्ध आहे. व्हाटसॲपवरून या क्रमांकावर ‘हाय’ अथवा ‘हॅलो’ मेसेज केल्यास पुढील संवाद साधता येईल. दिलेल्या पर्यायांमधून नागरिकांना त्यांची तक्रार करता येईल. तक्रार केल्यानंतर त्यांच्या तक्रारीची स्थिती, त्यावर केलेल्या उपाययोजना नागरिकांना त्याच क्रमांकावरून समजतील. याची प्राथमिक आवृत्ती (विटा व्हर्जन) सादर केली असून ही सुविधा लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली जाणार आहे. त्यानंतर शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

ज्येष्ठांसाठी उपयोजन (ॲप)

ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयोजन विकसित केले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी रुग्णवाहिका, जवळच्या रुग्णालयांची माहिती, शासकीय वैद्यकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. सायबर फसवणूक होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी याबाबतही जनजागृती करण्यात येणार आहे. ज्येष्ठांना तातडीची आवश्यक मदत केली जाणार आहे. लवकरच हे ॲप कार्यान्वित केले जाणार आहे.

संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या pcpc.gov.in या संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण केले आहे. नागरिकांना पोलिस ठाण्याला भेट दिल्यानंतर पोलिसांच्या वर्तणुकीचा अनुभव शेअर करता यावे, यासाठी नवीन फीडबॅक फॉर्म तयार केला आहे. भाडेकरुंची माहिती ऑनलाईन माध्यमातून भरता येईल. वाहतूक चलन माहिती आणि दंड भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

‘ट्राफिक बडी’ हा उपक्रम लोकेशन बेस आहे. त्यामुळे तक्रारदाराला खोटी माहिती देता येणार नाही. तसेच तक्रारदाराला त्याच्या तक्रारीवर केलेल्या कारवाईची माहिती मिळेल. वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी नागरिकांना या माध्यमातून सूचना करता येतील. स्थानिक परिसरातील वाहतूक बदलाची माहिती देखील या माध्यमातून नागरिकांना मिळेल. असा उपक्रम करणारे राज्यातील पहिले पोलिस आयुक्तालय आहे.
- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड 

Web Title: pune news Citizens will become the police's CCTV Pimpri-Chinchwad Police to soon implement 'Traffic Buddy' system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.