Video : व्हीएसआर कंपनीच्या अध्यक्षांना सीआयडीकडून व्हीआयपी ट्रीटमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 11:52 IST2026-03-07T11:51:01+5:302026-03-07T11:52:03+5:30

- आमदार रोहित पवार यांचा आरोप, एफआयआर दाखल होईपर्यंत पाठपुरावा करणार

pune news cid gives VIP treatment to VSR company chairman | Video : व्हीएसआर कंपनीच्या अध्यक्षांना सीआयडीकडून व्हीआयपी ट्रीटमेंट

Video : व्हीएसआर कंपनीच्या अध्यक्षांना सीआयडीकडून व्हीआयपी ट्रीटमेंट

पुणे : उपमुखमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत संशयाची सुई असलेल्या व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे मालक व्ही. के सिंग यांची सलग आठ तास चौकशी करण्यात आल्याचे चित्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) रंगवले. असले तरी प्रत्यक्षात सीआयडीकडून त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी (दि. ६) माध्यमांशी बोलताना केला. स्वतःच्या पोलिस संरक्षणात आलेल्या सिंग यांना पोलिसांनी चहा, नाष्टा, जेवण तर दिलेच; तसेच, शुक्रवारच्या क्रिकेट मॅचचा आनंदही त्यांनी काही काळ सीआयडी कार्यालयात लुटल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली.

सिंग यांची गुरुवारी (दि. ५) सीआयडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर आमदार पवार कार्यकर्त्यांसमवेत शुक्रवारी सीआयडी कार्यालयात दाखल झाले. एआयबीचा अहवाल आल्याने आता त्याबाबत एफआयआर दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर सीआयडी कार्यालयाबाहेर रोहित पवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी चौकशीसाठी सिंग आपल्या बंदूकधारी सुरक्षा व्यवस्थेच्या तीन वाहनांसह पाषाणमधील या कार्यालयात आले होते. पोलिसांनी सिंग यांच्याबरोबरच त्यांच्या वैयक्तिक ताफ्यातील सुरक्षा रक्षकांचीही उत्तम व्यवस्था केली होती. सिंग यांची आठ तास चौकशी करण्यात आल्याचा दावा सीआयडीने केला आहे. मात्र, आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार सिंग यांची जेमतेम एक ते दीड तास चौकशी करण्यात आली. सिंग यांच्यासोबत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचीही बडदास्त सीआयडीने ठेवली होती, असा आरोपदेखील त्यांनी केला.

एके-४७ सारखी शस्त्रे घेऊन सिंग सीआयडी कार्यालयात जातातच कसे काय? त्यांना कोणी अटकाव का केला नाही? एकीकडे माध्यमांना दिवसभर उन्हात ताटकळत ठेवण्यात आले आणि आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या सिंग यांना विशेष वागणूक दिले जाते ? याचा अर्थ काय ? एवढेच, नव्हे तर चौकशी संपल्यानंतर काळ्या काचेच्या विशेष वाहनातून सिंग यांना दुसऱ्या रस्त्याने बाहेर काढण्यात आले.

सीआयडीचा तपास हवेत सुरू असून व्ही. के. सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कलम १८० अंतर्गत आम्ही जबाब दिला असून त्याची दखल घेणे आवश्यक आहे. मात्र, सीआयडी तपासात केवळ वेळकाढूपणा करत आहे, असेही ते म्हणाले. एएआयबीचा अहवालही चुकीचा असल्याचा दावा करत त्यांनी सांगितले की, अपघातस्थळी झाडे नसतानाही अहवालात झाडे दाखवली आहेत तसेच विमान डावीकडे वळून कोसळले असताना अहवालात ते उजवीकडे वळल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहितीही रोहित पवार यांनी दिली. प्रभावी लोकांच्या मदतीने हा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रकरणात एफआयआर दाखल होईपर्यंत आमचा लढा जारी राहणार आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.

दिल्लीतील नेत्यांची भेट घेणार...

यासंदर्भात दिल्ली येथे जाऊन दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच इंडिया आघाडीतील नेत्यांची भेट घेऊन संसदेत हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. २०१९ च्या मुंबई येथील विमान अपघातात किरीट सोमय्या यांच्या पुढाकारामुळे गुन्हा दाखल झाला होता. मग अजित पवार एवढे मोठे लोकनेते असताना गुन्हा दाखल का होत नाही? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या माध्यमातून संसदेत समिती नेमून या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी देखील करणार असल्याचे आमदार  रोहित पवार यांनी सांगितले.

Web Title : वीएसआर कंपनी के अध्यक्ष को सीआईडी द्वारा वीआईपी ट्रीटमेंट: आरोप

Web Summary : विधायक रोहित पवार ने वीएसआर के वी.के. सिंह को अजित पवार की मौत के मामले में सीआईडी द्वारा पूछताछ के दौरान वीआईपी ट्रीटमेंट देने का आरोप लगाया। उन्होंने कहा कि जांच में पारदर्शिता की कमी है। पवार ने प्राथमिकी दर्ज करने और निष्पक्ष जांच के लिए दिल्ली के नेताओं को शामिल करने की योजना बनाई है।

Web Title : CID Accused of VIP Treatment for VSR Company Chairman

Web Summary : MLA Rohit Pawar alleges VIP treatment for VSR's V.K. Singh during CID questioning in Ajit Pawar's death case. He claims Singh enjoyed privileges while the investigation lacks transparency. Pawar demands FIR filing and plans to involve Delhi leaders for a fair probe.