लग्नानंतर लैंगिक असक्षमता, समलैंगिकता; घटस्फोट वाढले
By नम्रता फडणीस | Updated: October 8, 2025 10:51 IST2025-10-08T10:51:03+5:302025-10-08T10:51:44+5:30
कुटुंबाने समाजाच्या भीतीने पैसे देत हे प्रकरण आपापसात मिटवले आणि परस्पर संमतीने घटस्फोट झाला. त्यानंतर संबंधित तरुणाने दुसरे लग्न केले हे एक वास्तववादी उदाहरण..!

लग्नानंतर लैंगिक असक्षमता, समलैंगिकता; घटस्फोट वाढले
पुणे :लग्नाच्या चार वर्षांनंतरही दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत, हे लक्षात आल्यानंतर अखेर घटस्फोटाच्या दिशेने पावले उचलली गेली. विवाहित महिलेला एका वर्षातच स्वतः समलैंगिक असल्याचे जाणवले, मात्र समाज व कुटुंबाच्या भीतीने ही गोष्ट पतीपासून लपवून ठेवली. या दरम्यान ती पतीपासून कायम दूर राहत होती, मात्र स्पष्ट उत्तर न मिळाल्याने पती संभ्रमात होता. शेवटी सत्य समोर आल्यानंतर पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि मुलीच्या कुटुंबाकडे लग्नातील अर्ध्या खर्चाची मागणी केली. कुटुंबाने समाजाच्या भीतीने पैसे देत हे प्रकरण आपापसात मिटवले आणि परस्पर संमतीने घटस्फोट झाला. त्यानंतर संबंधित तरुणाने दुसरे लग्न केले हे एक वास्तववादी उदाहरण!
हे उदाहरण अपवादात्मक वाटले तरी प्रत्यक्षात अशा अनेक घटना समोर येत असून, समलैंगिकता किंवा लैंगिक असक्षमता लपवून विवाह केले जात असल्याचे वास्तव उघड होत आहे. परिणामी, जोडीदाराची फसवणूक होत असून, नात्यात ताणतणाव निर्माण होऊन घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, लैंगिक असक्षमता हे घटस्फोटाचे एक महत्त्वाचे कारण म्हणून पुढे येऊ लागले आहे.
कुटुंबाचा दबाव, समाजाची भीती अन् संवादाचा अभाव
तरुणाई उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही अनेकांना आपल्या लैंगिकतेविषयी किंवा आरोग्यदृष्ट्या असलेल्या अडचणींबाबत कुटुंबाशी मोकळेपणाने बोलता येत नाही. यामुळे अनेक वेळा वैयक्तिक सत्य लपवून विवाह होत असून, त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत.
आरोग्य कुंडलीचे महत्त्व
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मानसिक आणि लैंगिक आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. लग्नापूर्वी वधू-वरांची केवळ कुंडली नव्हे, तर ‘आरोग्य कुंडली’ पाहणे गरजेचे बनले आहे. योग्य चाचण्यांमुळे अनुवंशिक आजार, लैंगिक क्षमता अथवा समलैंगिकता लक्षात येऊ शकते. त्यामुळे वेळेत उपचार अथवा समुपदेशन घेऊन योग्य निर्णय घेता येऊ शकतो. मानसोपचारतज्ज्ञांशी सल्लामसलत करून समस्येचे समाधान करता येते, मात्र याबाबत समाजात अद्याप जागरूकतेचा अभाव दिसून येत आहे.
हल्ली स्वतःची लैंगिक असक्षमता लपविण्यासाठीही लग्न केली जात आहेत. एका प्रकरणात समलैंगिक असलेल्या तरुणाने कुटुंबाच्या दबावामुळे लग्न केले. विवाहानंतर पत्नीसमवेत नांदता न आल्याने पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला. पतीने त्यास कोणताही विरोध केला नाही. तो पत्नीला आर्थिक भरपाई देण्यासही तयार होता. सध्या तो एका पुरुष जोडीदारासोबत राहात आहे. - ॲड. प्रसाद निकम, कौटुंबिक न्यायालयातील वकील
विवाहपूर्व समुपदेशन आणि पालकांनी तरुण-तरुणींशी कोणतीही आडकाठी न ठेवता संवाद साधणे खूप आवश्यक आहे. समलैंगिकतेविषयी समाजात जनजागृती व्हायला पाहिजे. - डाॅ. शिल्पा चिटणीस-जोशी, वंध्यत्व आणि स्त्रीरोगतज्ज्ञ
आपल्याकडे लैंगिकतेवर फारशी चर्चाच होत नाही. भारतात लग्नापर्यंत मुलीने कुमारी राहिले पाहिजे हे बंधनकारक केल्याने लैंगिकतेचे एक्स्प्लोरेशनच होत नाही, जे करायचे ते लग्नानंतरच करा असे सांगितले जाते. त्यामुळे तरुण/तरुणींना लैंगिकता खूप उशिरा कळते. जरी काहींना आपण समलैंगिक आहोत हे माहिती असले तरी अशा व्यक्तींना बहिष्कृत केले जाते. त्यामुळे भीतीमुळे ते आपली ओळख लपवतात आणि नॉर्मल माणसारखे वागतात. यासाठी शालेय स्तरावर लैंगिक शिक्षण देणे आवश्यक आहे आणि लैंगिकतेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. - डॉ. ऐश्वर्या रेवडकर, लैंगिक आरोग्यतज्ज्ञ