शून्य + शून्य = भोपळा; आशिष शेलारांचा मनसे-उबाठावर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:19 IST2025-08-20T15:18:59+5:302025-08-20T15:19:47+5:30
शशांक राव आणि प्रसाद लाड या दोघांनीच ठाकरेंच्या पक्षाला मुंबई कुणाच्या पाठीशी आहे हे दाखवून दिले. त्यामुळे मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून मी या दोघांची मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून निवड करतो.

शून्य + शून्य = भोपळा; आशिष शेलारांचा मनसे-उबाठावर घणाघात
पुणे - ‘बेस्ट कामगारांच्या सोसायटीच्या निवडणुकीत आम्ही भाजप पक्ष म्हणून उतरलो नव्हतो. त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी राजकारण केले. त्याचे त्यांना फळ मिळाले आणि हाती भोपळा ( शून्य + शून्यची बेरीज म्हणजे शून्यच ) आला,’ अशी टीका सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोठा इशारा असून लवकरच भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर होईल. त्यात शशांक राव आणि प्रसाद लाड अधिकृतपणे स्टार प्रचारक म्हणून असतील. या दोघांनीच बेस्ट निवडणुकीत उद्धवसेना आणि मनसेला मुंबईकरांचा आशीर्वाद कुठे आहे हे दाखवून दिले. शोले चित्रपटातील ‘जय-वीरू’प्रमाणेच ही जोडी आता मुंबई भाजपच्या निवडणुकीत मैदानात उतरणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्यात गणेशोत्सवानिमित्त आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शेलार म्हणाले, ‘या निवडणुकीच्या निकालाने मुंबई तसेच मराठीचा विजय झाला आहे तसेच हा विजय भाजपचा आहे. बेस्ट निवडणूक ही राजकारणाची नव्हती, तर ही कामगारांची निवडणूक होती. ‘बेस्ट’वर प्रेम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ही लढाई लढली.