गुंजवणी प्रकल्प,विमानतळ यांसह अन्य प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भाजप प्रवेश;संजय जगताप यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 09:55 IST2025-07-15T09:53:57+5:302025-07-15T09:55:36+5:30
- संवाद मेळाव्यात माजी आमदार संजय जगताप यांची माहिती; सासवडला उद्या भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत कार्यक्रम, कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडले

गुंजवणी प्रकल्प,विमानतळ यांसह अन्य प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भाजप प्रवेश;संजय जगताप यांची माहिती
सासवड : गुंजवणी, विमानतळ, जेजुरी देवस्थान विकास आराखडा याचबरोबर सर्वसामान्यांच्या अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भाजपासोबत आम्ही बिगर हुंड्याचे लग्न केले आहे. यामध्ये माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही. आघाडीच्या राजकारणाचा आम्हाला कायमच फटका बसला असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त करीत भाजपात प्रवेश करीत असल्याचे माजी आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर, येत्या बुधवारी (दि. १६ जुलै) सासवड येथे भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १४) सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे संजय जगताप समर्थकांचा संवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नंदकुमार जगताप, मार्तंड भोंडे, रमणिकलाल कोठडीया, राजवर्धिनी जगताप, यशवंत जगताप, संदीप फडतरे, राजेश काकडे, संजय हरपळे, महेंद्र शेवाळे, सुनीता कोलते, नीलम होले, हाजी शाहजान शेख, अशोक निगडे, मनीषा नाझीरकर, देविदास कामथे, विक्रम दगडे, तुषार माहूरकर, विठ्ठल मोकाशी, आदी मान्यवर उपस्थित होते. हेमंत सोनवणे, सुरेखा ढवळे, विजय अधिकारी, सुरेश काकडे, माणिक चोरमले, महादेव टिळेकर, अमोल गायकवाड, लक्ष्मण वाघापुरे, संजय टिळेकर, अॅड. पूनम शिंदे,महेंद्र शेवाळे, अमित पवार, महेंद्र शेवाळे, अशोक झेंडे, संदीप बांदल, संजय आंबेकर, डॉ. मनोज शिंदे, दादा बाठे, सुभाष कुतवळ, संजय चव्हाण, मंजूषा गायकवाड, अनिल जाधव, शिवराम शेंडकर, आण्णा कदम, विलास शेवाळे, सोमनाथ जाधव, आदी उपस्थित होते.
"संजय जगताप आप आगे बढो.. हम तुम्हारे साथ है", "तुम्ही बांधाल ते तोरण.. तुम्ही ठरवताल ते धोरण" अशा घोषणांनी आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन दणाणून गेले होते. पुरंदर आणि हवेली तालुक्यातील अनेक गावांचे आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, सदस्य, माजी नगरसेवक, सोसायट्यांचे अध्यक्ष, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी मनोगतातून, "तालुक्याच्या विकासासाठी तुम्ही घेतलेला निर्णय योग्य असून, आम्हाला तो मान्य आहे. हा निर्णय फार पूर्वी व्हायला पाहिजे होता.
कार्यकर्त्यांचाही प्रवेश
सासवड येथील पालखीतळावर उद्या (दि. १६) सकाळी १० वाजता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांचे उपस्थितीत माजी आमदार संजय जगताप यांच्यासह कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
जगताप हाच आमचा पक्ष
"संजय जगताप हाच आमचा पक्ष आणि झेंडा आहे. आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत" अशी ग्वाही दिली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या हिंदुत्ववादी संघटनेने याप्रसंगी पाठिंबा दिला. सागर जगताप यांनी मेळाव्याचे सूत्रसंचालन केले.
काँग्रेसचा नवा जिल्हा अध्याय, १६ जुलैला जिल्हा बैठक आयोजित
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेसची १६ जुलैला काँग्रेस भवनमध्ये दुपारी दोन वाजता बैठक घेतली जाणार आहे. प्रदेश उपाध्यक्ष देवीदास भन्साळी यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे.
पुरंदर आणि जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोधैर्य टिकवण्यासाठी प्रदेश शाखेच्या सूचनेनुसार १६ जुलैच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत पक्षाचे जिल्ह्यातील सर्व जुने आणि अनुभवी लोकप्रतिनिधी, तालुका काँग्रेस समितींचे सर्व पदाधिकारी, पक्षाच्या महिला आघाडीसह विविध आघाड्यांचे प्रमुख यांना बोलावण्यात आले आहे.
ही बैठक पक्षाच्या नव्या उभारणीचा पाया रचण्यास महत्त्वाची ठरणार आहे. निष्ठा आणि बांधीलकी या गुणांची जाणीव असून, ती जिल्ह्यातील नवीन राजकीय चळवळीची ग्वाही देणारी असेल. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत परस्पर संवाद आणि नव्या जबाबदाऱ्यांवर सविस्तर चर्चा होणार असल्याचे भन्साळी यांनी सांगितले.