भीमा पाटस सहकारी साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा; खासगीकरण नाही : राहुल कुल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 15:31 IST2025-09-28T15:30:03+5:302025-09-28T15:31:14+5:30
पाटस : भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार राहुल कुल यांनी कारखाना कायद्याच्या चौकटीतून निराणी शुगर्सला चालवायला दिला ...

भीमा पाटस सहकारी साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा; खासगीकरण नाही : राहुल कुल
पाटस : भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार राहुल कुल यांनी कारखाना कायद्याच्या चौकटीतून निराणी शुगर्सला चालवायला दिला असला, तरी तो सहकारी तत्त्वावरच चालतो आणि सभासदांच्या मालकीचा आहे, यावर ठाम विश्वास व्यक्त केला. कारखान्याच्या ४३ व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी सभासद आणि कामगारांच्या हितासाठी कारखाना प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल कुल यांनी स्पष्ट केले की, कारखाना अडचणीत असताना निराणी शुगर्सला कामकाजासाठी दिला गेला, परंतु त्याचे खाजगीकरण झालेले नाही. "काही मंडळी कारखान्याला ऊस न घालता सभेत प्रश्न विचारतात आणि खाजगीकरणाच्या अफवा पसरवतात. पण सभासदांचा विश्वास आम्ही कायम राखू. हा कारखाना शेवटपर्यंत सभासदांच्या मालकीचा राहील," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कुल यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने कारखाना प्रगतीपथावर आहे. "टप्प्याटप्प्याने कारखान्याचे कर्ज कमी होत आहे. कामगारांच्या थकीत देण्यांबाबत चर्चा झाली असून, टप्प्याटप्प्याने पैसे देण्याचे ठरले आहे. काहींनी न्यायालयात आणि उपोषणाद्वारे प्रश्न निर्माण केले, तरी आम्ही कामगारांच्या देणी देण्यास बांधील आहोत," असे त्यांनी नमूद केले.
कुल-थोरात जुगलबंदी
सभेत माजी आमदार रमेश थोरात यांनी कारखान्याच्या गोडाऊनमधील एक लाख साखर पोत्यांच्या गहाळ प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. यावर राहुल कुल यांनी सांगितले की, पुणे जिल्हा बँकेने कर्जापोटी साखर पोते आणि गोडाऊन ताब्यात घेतले होते. यावर थोरात यांनी एमएससी बँकेने जप्तीचे आदेश दिल्याचा दावा केला. यावर कुल यांनी सोमवारी कागदपत्रे सादर करून स्पष्टता आणण्याचे आश्वासन दिले. तसेच, सभासदांच्या हितासाठी कर्जावरील व्याज कमी करण्यासाठी पत्र देण्याचेही ठरले. यानंतर कुल यांनी विनोदाने, "आता आमच्या दोघांचं ठरलं आहे," असे म्हणताच सभेत हास्यकल्लोळ झाला.
सभासदांची मागणी
वैशाली नागवडे यांनी सभेत विचारले की, "कुल-थोरात यांचं नेमकं काय ठरलं?" यावर सभेत हशा पिकला. तसेच, त्यांनी प्रत्येक सभासदाला दिवाळीला २० किलो साखर देण्याची मागणी केली. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, वैशाली नागवडे, अरविंद गायकवाड, अतुल ताकवणे, मनोज फडतरे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
सभेचे संचालन
सभेचे अहवाल वाचन प्रभारी कार्यकारी संचालक तुषार पवार यांनी केले. उपाध्यक्ष नामदेव बारवकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर सूत्रसंचालन विकास शेलार आणि आभार प्रदर्शन तुकाराम ताकवणे यांनी केले.