बारामती दूध संघाचे नामांतर; आता ‘सहकारमहर्षी अजितदादा पवार सहकारी दूध उत्पादक संघ’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:40 IST2026-02-04T15:38:41+5:302026-02-04T15:40:50+5:30
संचालक मंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय; अजितदादांच्या योगदानाला मानवंदना

बारामती दूध संघाचे नामांतर; आता ‘सहकारमहर्षी अजितदादा पवार सहकारी दूध उत्पादक संघ’
बारामती : बारामती तालुका दूध उत्पादक संघाने संचालक मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय घेत संघाच्या नावात बदल करण्याचा ठराव मंजूर केला आहे. यानुसार आता बारामती दूध संघ ‘सहकारमहर्षी अजितदादा पवार सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित’या नावाने ओळखला जाणार आहे.
याबाबत संघाचे चेअरमन संजय रामचंद्र कोकरे व व्हा. चेअरमन दत्तात्रय सदाशिव वावगे यांनी माहिती दिली. या वेळी संघाचे सर्व संचालक मंडळ सदस्य, व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश राणे, उपमहाव्यवस्थापक अमोल चव्हाण आदी उपस्थित होते.
अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती दूध संघाची वाटचाल सुरू होती. त्यांच्या नेतृत्वात संघाने सातत्याने प्रगती साधत विविध प्रकल्प उभारले. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक, तांत्रिक व संघटनात्मक पाठबळ देत त्यांनी सहकार क्षेत्राला भक्कम आधार दिला. त्यांच्या या मोलाच्या योगदानाचा सन्मान व्हावा आणि त्यांची आठवण कायम स्मरणात राहावी, यासाठी संघाच्या नावात बदल करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. संघाच्या या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून सहकार क्षेत्रात बारामती दूध संघाची ओळख अधिक बळकट होणार आहे.