खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांचे दिवाळे..! करताहेत दुप्पट प्रवासी भाडे आकारणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:48 IST2025-10-09T09:47:25+5:302025-10-09T09:48:00+5:30
- आदेशाकडे खासगी बस चालकांचे दुर्लक्ष; जादा तिकीट दर घेणाऱ्या बसचालकांविरोधात तक्रार करण्याचे प्रशासनाचे आवाहन; दीपावलीच्या काळात नियमानुसार दीडपट भाडे आकारणीस मुभा

खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांचे दिवाळे..! करताहेत दुप्पट प्रवासी भाडे आकारणी
पुणे : दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असते. सध्या रेल्वे गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाल्यामुळे अनेक रेल्वे गाड्यांची तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळी काळात खासगी गाड्यांच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. शिवाय पुण्यातून विदर्भ आणि मराठवाड्यात जाणाऱ्या बस चालकांनी तिकीट दरामध्ये दुपटीने वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांचे दिवाळीपूर्वीच दिवाळे निघत आहे.
पुण्यात नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने अन्य शहरातील राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दिवाळीसाठी हजारो नागरिक गावी जातात. पुण्यात प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भातील नागरिकांची संख्या मोठी असून, त्यांना घरी जाता यावे, यासाठी एसटी महामंडळाकडून अतिरिक्त बस सोडण्यात आल्या आहेत. एसटी बस, रेल्वेचे दिवाळी अगोदर दोन ते तीन दिवसांचे बुकिंग ‘फुल्ल’ झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सचाच पर्याय राहिला आहे.
खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी दिवाळीच्या अगोदर दोन ते तीन दिवसांपासून तिकीट दरात दुप्पट ते तिप्पट वाढ केल्याचे दिसून येत आहे. खासगी ट्रॅव्हल्स चालकांना नियमानुसार एसटी बसच्या दीडपट तिकीट घेता येते; मात्र त्यांनी दर प्रमाणाबाहेर वाढवले आहेत. त्यामुळे नागरिकांचे प्रवासासाठी हजारो रुपये खर्च होणार आहेत. त्यामुळे गावी जावे की नाही? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
तिकिटात दुप्पट वाढ
विदर्भ व मराठवाड्यात जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. याठिकाणी जाणाऱ्या स्लिपर खासगी बसचे तिकीट दुपटीपेक्षा जास्त झाल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने १५ ऑक्टोबरपासून तिकीट दरात मोठी वाढ झाल्याचे ऑनलाईन बुकिंग करताना दिसत आहे. पुण्यावरून नागपूरला जाण्यासाठी एरव्ही १७०० ते २००० रुपये तिकीट असते. पण, आता थेट साडेतीन ते चार हजार रुपये तिकीट झाले आहे. त्यामुळे तातडीने अशा ट्रॅव्हल्स चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
आरटीओच्या सूचनेकडे कानाडोळा
सणासुदीच्या काळात खासगी बस चालकांनी तिकीट दरात वाढ करू नये, अशा सूचना आरटीओकडून देण्यात आल्या आहेत. खासगी बस सुटतात, त्याठिकाणी याबाबतचे आरटीओकडून फलक लावण्यात आले आहेत. दरवाढ करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र, खासगी वाहतूकदरांकडून आरटीओंच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे.
प्रवाशांनो येथे करा तक्रार : रिक्षा, कॅब आणि खासगी बस चालकांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) ८२७५३३०१०१ हा व्हॉट्सॲप क्रमांक सुरू केला आहे. नागरिकांकडून रिक्षा चालकांकडून केल्या जाणाऱ्या लुटीच्या तक्रारींवर आरटीओकडून कारवाई करण्यात येत आहे. प्रवाशांनी सुद्धा जादा तिकीट घेणाऱ्या खासगी वाहतूक बसचालकांविरोधात तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मार्गाचे नाव ---- सरासरी ऑनलाइन तिकीट दर
पुणे - नागपूर -- ३०००-३५००
पुणे - अमरावती -- ३०००-३२००
पुणे - लातूर -- १५००-२०००
पुणे - नांदेड -- २२००-२५००
पुणे - हैदराबाद -- ३०००-३५००
पुणे - जळगाव --२५००-३०००
खासगी ट्रॅव्हल्स चालकांना एसटी बसच्या दीडपट तिकीट घेण्यास नियमानुसार परवानगी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ट्रॅव्हल्सची तपासणी केली जात आहे. तसेच बस असोसिएशनबरोबर बुधवारी बैठक घेण्यात आली आहे. दिवाळीत नियमानुसार तिकीट दर आकारावा, अशी सूचना करण्यात आली आहे. जास्त भाडे घेतल्यास प्रवाशांनी आरटीओकडे तक्रार करावी. अशा ट्रॅव्हल्सवर कारवाई केली जाईल. - स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे