इंदापूरच्या तहसीलदारांवर हल्ला; गौण खनिज तपासणीदरम्यान मारहाण, खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:12 IST2026-03-10T12:11:18+5:302026-03-10T12:12:25+5:30
पैशांची मागणी नाकारताच संताप; माहिती अधिकार कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

इंदापूरच्या तहसीलदारांवर हल्ला; गौण खनिज तपासणीदरम्यान मारहाण, खळबळ
इंदापूर : गौण खनिज वाहतूक परवान्याची तपासणी सुरू असताना एका व्यक्तीने पैशांची मागणी करत तहसीलदारांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.९) दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास निमगाव केतकी गावाजवळ निमगाव केतकी–पिटकेश्वर रस्त्यावर घडली. याप्रकरणी संतोष रामदास मोरे (रा. वरकुटे खुर्द, ता. इंदापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो वादग्रस्त माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या परवान्याची तपासणी करत होते. यावेळी आरोपी संतोष मोरे हा बुलेट मोटारसायकलवरून घटनास्थळी आला आणि शासकीय वाहनास बुलेट आडवी घालून अडवले. त्यानंतर गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांकडून पैसे घेऊन त्यापैकी दहा हजार रुपये तत्काळ देण्याची मागणी त्याने केली. तहसीलदारांनी ही मागणी फेटाळून लावत नियमानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट सांगितले. यावर संतापलेल्या आरोपीने अर्वाच्य शिवीगाळ करत तहसीलदारांना मारहाण केली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांनाही सुरक्षितता नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यापूर्वीही हल्ल्याच्या घटना
दरम्यान, इंदापूरच्या तहसीलदारांवर हल्ला होण्याची ही पहिलीच घटना नसल्याचे समोर आले आहे. तहसीलदार जीवन बनसोडे यांच्यावर २२ ऑगस्ट २०२५ रोजी बाभूळगाव येथे शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी गेले असताना काहींनी हल्ला केला होता. त्याप्रकरणी १५ ते २० जणांविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
यापूर्वी २४ मे २०२४ रोजी तत्कालीन तहसीलदार श्रीकांत पाटील हे प्रशासकीय भवनाकडे जात असताना संविधान चौकाजवळ स्कॉर्पिओमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर हल्ला करून वाहनाची नासधूस केली होती. चालक मल्हारी मखरे यांनी प्रसंगावधान राखल्याने तहसीलदार बचावले होते.
एक दिवसीय आंदोलन
या घटनेच्या निषेधार्थ महसूल अधिकारी व कर्मचारी एक दिवस लेखणी बंद आंदोलन करणार आहेत. तहसीलदार बनसोडे हे आपल्या कार्यपद्धतीबाबत याआधी वादात सापडले असले तरी या घटनेत त्यांचे उचललेले पाऊल योग्य होते असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.