धक्का मारल्याचा जाब विचारला,टोळक्याने थेट जीवच घेतला;उरळी देवाची येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 17:11 IST2025-07-12T17:01:35+5:302025-07-12T17:11:21+5:30
- धक्का का मारला, असा जाब विचारल्यानंतर झालेल्या वादातून टोळक्याने लाकडी दांडक्याने, लाथाबुक्क्यांनी मामाला मारहाण केली.

धक्का मारल्याचा जाब विचारला,टोळक्याने थेट जीवच घेतला;उरळी देवाची येथील घटना
पुणे : बटाटा चिप्स आणण्यासाठी गेलेल्या मामाला टोळक्याने धक्का दिला. धक्का का मारला, असा जाब विचारल्यानंतर झालेल्या वादातून टोळक्याने लाकडी दांडक्याने, लाथाबुक्क्यांनी मामाला मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रामलोचन हुसेनी कोरी (४६, रा. उरुळी देवाची) असे खून झालेल्या मामाचे नाव आहे. या घटनेत धीरज राम हेदेखील जखमी झाले आहेत.
याप्रकरणी भाचा संतकुमार कोरी (२५, रा. नारंग ट्रान्सपोर्ट, जुना पालखी मार्ग, उरुळी देवाची, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी देवेश धुर्वे (२२) आणि प्रेमलाल कुमरे (२१) यांच्यासह अन्य ४ ते ५ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उरुळी देवाची येथील साई एंटरप्रायझेस दुकानाजवळ व नारंग ट्रान्सपोर्ट लेबर रूम येथे गुरुवारी (दि. १०) रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचे मामा रामलोचन कोरी हे मूळचे उत्तर प्रदेशातील राहणारे असून, नारंग ट्रान्सपोर्ट येथे हमालीकाम करतात. त्यांचे मामा रामलोचन कोरी हे बटाटा चिप्स आणण्यासाठी साई एंटरप्रायझेस या दुकानात गेले होते. दुकानाच्या बाहेर आरोपींनी मामाला धक्का दिला. त्याचा जाब त्यांनी विचारल्याने या टोळक्याने त्यांच्याशी वाद घालून त्यांच्या डोक्यात जाड लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यांच्या इतर साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यात मामा यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हे टोळके त्यांच्या रूमवर आले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून हातातील लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यांच्या रूममधील धीरज राम यांच्या हातावर व गुडघ्यावर मारहाण करून त्यांना जखमी केले. पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे हे पुढील तपास करत आहेत.