राज्यात ६ लाख ५० हजार इतक्या असाक्षरांनी दिली परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 09:27 IST2025-03-25T09:26:46+5:302025-03-25T09:27:16+5:30

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत आयोजन

pune news As many as 6 lakh 50 thousand illiterate people in the state gave | राज्यात ६ लाख ५० हजार इतक्या असाक्षरांनी दिली परीक्षा

राज्यात ६ लाख ५० हजार इतक्या असाक्षरांनी दिली परीक्षा

पुणे : केंद्रपुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत (एनबीएसके -२०२२-२७) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवारी (दि. २३) पार पडली. राज्यात एकूण ५३ हजार २७१ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला राज्यभरातून ८ लाख ४ हजार इतक्या असाक्षरांनी परीक्षा देणे अपेक्षित होते. त्यापैकी सुमारे ६ लाख ५० हजार इतक्या असाक्षरांनी परीक्षा दिली.

पंधरा वर्षे आणि त्यावरील वयोगटातील असाक्षर व्यक्तींमध्ये महत्त्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसित करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. या कौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण, इ. बाबींचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत २०२४-२५ मध्ये उल्लास अॅपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांसाठी ही चाचणी घेण्यात आली. परीक्षा केंद्रावर ऑफलाइन पद्धतीने व असाक्षरांच्या सोयीनुसार चाचणी घेण्यात आली. एकूण १५० गुणांची ही चाचणी घेण्यात आली. मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तेलुगू, तमीळ, बंगाली अशा एकूण ९ माध्यमांतून ही चाचणी घेण्यात आली. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी विहित निकषानुसार उत्तीर्ण झाल्यानंतर नवसाक्षरांना केंद्रशासनाकडून प्रमाणपत्र / गुणपत्रक देण्यात येणार आहे.

यावेळी असाक्षरांचे औक्षण करून, पुस्तक, गुलाबपुष्प / पुष्पगुच्छ देऊन तसेच गोड खाऊ देऊन आकर्षक फलक लेखन करून व टाळ्या वाजवून परीक्षा केंद्रावर जोरदार स्वागत करण्यात आले. असाक्षरांचा चाचणीसाठी मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला.

७० वर्षांच्या पुढील आजी-आजोबाही झाले नवसाक्षर

७० वर्षांच्या पुढील आजी-आजोबाही नवसाक्षर होण्याचा निश्चय करून आनंदाने परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. जे असाक्षर परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यायला समर्थ नव्हते, अशा असाक्षरांना स्वतःच्या घरी चाचणी देण्याची व्यवस्था करण्यात आली. या चाचणीसाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. अनेक परीक्षा केंद्रांवर असाक्षरांसाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती.

मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे दोन लाखांनी परीक्षेत उपस्थिती वाढली आहे. शासन प्रशासनातील मान्यवरांचा उल्लेखनीय सहभाग, वैविध्यपूर्ण उपक्रम, राज्यस्तरावरून वेळोवेळी घेतला जाणारा आढावा या सर्व बाबींना तितकाच क्षेत्रीय यंत्रणेकडून मिळणारा प्रतिसाद व असाक्षरांचाही स्वयंस्फूर्तीने समावेश यामुळे एकूणच 'उल्लास' ही जनचळवळ बनत आहे.  -राजेश क्षीरसागर, राज्य समन्वयक, उल्लास

Web Title: pune news As many as 6 lakh 50 thousand illiterate people in the state gave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.