मोठा प्लॅन तयार..! पुणे-पिंपरी चिंचवडच्या वाहतूक सुविधांसाठी भरघोस निधी; देवेंद्र फडणवीसांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:19 IST2026-03-13T13:16:19+5:302026-03-13T13:19:09+5:30
- पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी येथे राज्यातील महत्त्वाचा आयटी आणि औद्योगिक परिसर असून येथे एमआयडीसीसह उद्योग आणि आयटी कंपन्या आहेत.

मोठा प्लॅन तयार..! पुणे-पिंपरी चिंचवडच्या वाहतूक सुविधांसाठी भरघोस निधी; देवेंद्र फडणवीसांची माहिती
पुणे -पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी आयटी परिसरातील वाढत्या वाहतुकीच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा वाढविण्यात येत आहेत. या परिसरातील वाहतुकीच्या व्यापक पायाभूत सुविधा विकासाचे नियोजन करण्यात आले असून, रस्ते विकासाच्या प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतुकीच्या सुविधा प्रकल्पाबाबत आमदार महेश लांडगे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. देवेंद्र फडणवीस त्यावर राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी येथे राज्यातील महत्त्वाचा आयटी आणि औद्योगिक परिसर असून येथे एमआयडीसीसह उद्योग आणि आयटी कंपन्या आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानुसार १८ मीटर आणि २४ मीटर रुंदीचे नवीन रस्ते प्रस्तावित करण्यात येत असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रिंग रोड, डीपी रस्ते, अंतर्गत रस्ते आणि प्रमुख प्रवेशद्वार मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. स्वामीनारायण मंदिर ते भुमकर पूल व नवले पूल परिसरातील काम सुरू असून पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे जाणाऱ्या अतिरिक्त सेवारस्त्यांसाठी निविदा प्रक्रिया आणि भूसंपादन प्रक्रिया सुरु आहे. नाशिक फाटा ते आरटीओ ते जुना मुंबई-पुणे रस्ता या भागात भोसरी गावठाण परिसरातील रस्त्यांचे १०० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे.
भोसरीतील स्पायरल रस्त्यासाठीही ७० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ट्रॅफिक सिग्नल प्रणाली आणि आधुनिक ट्रॅफिक नियोजनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे, असे राज्यमंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केले आहे. या प्रश्नाच्या चर्चेत विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार, राजेश पवार, शंकर जगताप, हेमंत रासणे, अॅड. राहुल कुल यांनी भाग घेतला.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे ९८ टक्के काम पूर्ण
- राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, नन्हे ते लावण पुलाचा सुमारे ३,६६० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून नाशिक फाटा ते केळ या मार्गावर आठपदरी पुलालाही मंजुरी मिळाली आहे. रिंग रोड प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनासाठी ६०० कोटी शासनाकडून उपलब्ध करून देणार आहे.
- पीसीएमपी ते फुगेवाडी, फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय, जिल्हा न्यायालय २ ते स्वारगेट तसेच वनाज ते गरवारे कॉलेज या मार्गावरील मेट्रोची कामे सुरू आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे सुमारे ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे.