आळंदीत दुहेरी प्रदूषणाचा विळखा...! धुरात गुदमरते आळंदी, फेसाखाली तडफडते इंद्रायणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 14:07 IST2026-02-21T14:06:54+5:302026-02-21T14:07:46+5:30
- डेपोला वारंवार आग, चौकशीचा अभाव, कचरा वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक, घंटागाडी कर्मचारी आणि परिसरातील रहिवाशांना श्वसनाचा तीव्र त्रास, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी झाकण्याचा प्रयत्न

आळंदीत दुहेरी प्रदूषणाचा विळखा...! धुरात गुदमरते आळंदी, फेसाखाली तडफडते इंद्रायणी
- भानुदास पऱ्हाड
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी येथे सध्या पर्यावरणाचा भीषण आणीबाणीचा प्रसंग निर्माण झाला आहे. एका बाजूला कचरा डेपोला लागलेल्या आगीचा विषारी धूर परिसरात पसरला आहे, तर दुसरीकडे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी वाहणारी पवित्र इंद्रायणी नदी रासायनिक फेसाच्या पांढऱ्या चादरीखाली गुदमरते आहे. आकाशात धुराचे ढग आणि नदीपात्रात फेस अशी दुहेरी प्रदूषणाची स्थिती निर्माण झाली असून, आळंदीचा श्वास अक्षरशः कोंडला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून कचरा डेपोची आग धुमसत असून, अग्निशमन दलाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे चित्र आहे. उष्णतेमुळे वाऱ्याचा वेग मंदावल्याने धूर जमिनीलगतच रेंगाळत आहे. त्यामुळे कचरा वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक, घंटागाडी कर्मचारी आणि परिसरातील रहिवाशांना श्वसनाचा तीव्र त्रास होत आहे. डोळ्यांची आग, घशात खवखव, सतत खोकला अशा तक्रारी वाढल्या आहेत. कचरा जळताना निर्माण होणाऱ्या डायऑक्सिनसारख्या विषारी वायूंमुळे दीर्घकालीन आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
गेल्या वर्षभरात डेपोला वारंवार आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, प्रत्येक वेळी आग विझवण्यापुरतीच कार्यवाही होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. आगीमुळे डेपोचे संरक्षक पत्रे जळून खाक झाले असून, विद्युत यंत्रणा कोलमडली आहे. तरीही कोणताही अधिकृत चौकशी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे कचरा व्यवस्थापनातील त्रुटी झाकण्यासाठीच हे प्रकार घडत आहेत का, असा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात असल्याने इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात पांढरा फेस साचला आहे. दुरून पाहताना नदीऐवजी रसायनांचा नाला असल्याचा भास होतो. स्नानासाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याशी हा थेट खेळ असून, आळंदीच्या धार्मिक व पर्यटन मूल्यालाही तडा जात आहे.
प्रशासनाने केवळ आश्वासने न देता ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. डेपोवर चोवीस तास सुरक्षा रक्षक तैनात करणे, उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, कचरा प्रक्रियेचे आधुनिकीकरण करणे आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
एकीकडे आग, दुसरीकडे फेस; प्रशासकीय यंत्रणा ढिम्म
धुरातील सूक्ष्म कणांमुळे फुफ्फुसांचे कायमस्वरूपी नुकसान होण्याची शक्यता आहे. वारंवार लागणाऱ्या आगीनंतरही डेपोवर चोवीस तास सुरक्षा रक्षक नाहीत. मागील आगींमधील नुकसानीचा तपशील अद्याप जाहीर झालेला नाही. रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात आले असून, भाविकांना स्नान करणेही कठीण झाले आहे.