बेशिस्त वाहनचालकांवर ‘एआय’ कॅमेऱ्यांची नजर;कॅमेरे बसविलेल्या वाहनातून फर्ग्युसन, जंगली महाराज रस्त्यावर गस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 19:30 IST2025-08-13T19:29:46+5:302025-08-13T19:30:29+5:30
पहिल्या टप्प्यात प्रायोगिकतत्त्वावर जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्त्यावर एआय कॅमेरे असलेले वाहन गस्त घालून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणार

बेशिस्त वाहनचालकांवर ‘एआय’ कॅमेऱ्यांची नजर;कॅमेरे बसविलेल्या वाहनातून फर्ग्युसन, जंगली महाराज रस्त्यावर गस्त
पुणे : बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कृत्रिम बु्द्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित (एआय) कॅमेरे बसविलेल्या वाहनांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिकतत्त्वावर जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्त्यावर एआय कॅमेरे असलेले वाहन गस्त घालून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणार आहे.
शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर विविध चौकांमध्ये व रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घेऊन वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. आता ‘प्रुफ ऑफ कन्सेप्ट’ (पीओसी) या प्रायोगिक प्रकल्पाअंतर्गत एआय कॅमेरे बसविलेली पोलिसांचे वाहन शहरातील वेगवेगळ्या भागांत गस्त घालणार आहे. या योजनेचा प्रारंभ मंगळवारी करण्यात आला. पोलिस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक आयुक्त नंदिनी वाग्याणी-पराजे यावेळी उपस्थित होते.
एआय कॅमेरे बसविलेले एक वाहन जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्त्यावर गस्त घालणार आहे. या वाहनांवरील कॅमेरे बेशिस्त वाहनचालकांना टिपून त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. वाहतूक नियमभंग केल्यानंतर त्वरित दंडात्मक कारवाईचा संदेश वाहनचालकांना मोबाइलवर मिळणार आहे. दरम्यान, गेल्या तीन महिन्यांत फर्ग्युसन रस्त्यावर वाहतूक नियमभंग करणाऱ्या तीन हजार ९४९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
कॅमेरे असलेल्या वाहनांची संख्या वाढविणार
प्रायोगिकतत्त्वावर सध्या जंगली महाराज आणि फर्ग्युसन रस्त्यावर एआय कॅमेरे बसविलेले वाहन गस्त घालणार आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या वाहनांची संख्या वाढविण्यात येणार आहे. बेशिस्तांवर कारवाई, तसेच वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होणार आहे, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले. या कॅमेऱ्यांमुळे रस्त्यावरचे वादविवाद कमी होतील, तसेच कारवाईही प्रभावी होईल.