फ्लेक्सवरील कारवाई नावापुरतीच;अधिकारी व मांडववाल्यांचे लागेबांधे; कारवाईनंतर फ्लेक्सचे सांगाडे जागेवरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 13:02 IST2025-10-05T13:01:59+5:302025-10-05T13:02:06+5:30
सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली

फ्लेक्सवरील कारवाई नावापुरतीच;अधिकारी व मांडववाल्यांचे लागेबांधे; कारवाईनंतर फ्लेक्सचे सांगाडे जागेवरच
पुणे : शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या बेकायदा फलकांवरील कारवाईत प्रशासनाकडून दुजाभाव केला जात असल्याचे समोर येत आहे. कारवाईदरम्यान रेक्झीनचे फ्लेक्स काढून लोखंडी आणि लाकडी सांगाडे जागेवरच ठेवले जात आहेत. तसेच ते पुन्हा मांडववाल्यांना दिले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे मांडववाले व अधिकाऱ्यांचे लागेबांधे याद्वारे उघड होत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आता सणाचे दिवस असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी केली जात आहे. शहरात गुरुवारी साजरा झालेल्या दसरा सणानिमित्त शुभेच्छा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापनदिन, धम्मचक्र प्रवर्तनदिन, वाढदिवस, विविध प्रकारच्या खरेदींवर सवलती असे मोठ्या प्रमाणात शहरभर फ्लेक्स उभारण्यात आले होते. सण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरभर कारवाई मोहीम राबवून दिवसभरात २५०० फ्लेक्स काढले. यापुढे अनधिकृतपणे बोर्ड, बॅनर, फ्लेक्स लावणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले. परंतु, ही कारवाई दिखाऊ असल्याचे आणि कारवाईमध्ये दुजाभाव केला जात असल्याचा प्रकार समोर येत आहेत. बेकायदा फ्लेक्स फाडून ते अतिक्रमण विभागाचा गाडीमध्ये टाकण्यात आले. परंतु हे फ्लेक्स उभारलेल्या लोखंडी फ्रेम मात्र जागेवरच ठेवून मांडववाल्यांना परत देण्याची मेहेरनजर दाखवली जात आहे.
वारजेतील माई मंगेशकर हॉस्पिटल ते आदित्य गार्डन रस्त्यावर उभारलेल्या बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेने कारवाई केली. मात्र, कारवाई करताना एका स्थानिक नेत्याच्या भावाच्या वाढदिवसाच्या फ्लेक्सवर मात्र कारवाई करण्याची हिंमत अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना दाखवता आली नाही. प्रशासनातील काही जणांकडून बेकायदा होर्डिंग्ज व फलकांना अभय दिले जात असल्याने बेकायदा होर्डिंग्ज आणि जाहिरात फलकांचे अर्थकारण लपून राहिलेले नाही. दरम्यान, नुकतेच नगररोड क्षेत्रीय कार्यालयातील एका निरीक्षकाला निलंबित करण्यात आले होते तर एकाची खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, वारज्यातील प्रकाराची महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे, बेकायदा फ्लेक्सवर जुजबी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.