कर्नाटकातील खून प्रकरणातील आरोपी पुण्यात अटक; सहप्रवाशाच्या फोन कॉलने उलगडला गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:23 IST2025-12-05T16:23:34+5:302025-12-05T16:23:56+5:30
खून करून मुंबईकडे पळ काढण्यासाठी आरोपी मधू पुण्याजवळ पोहोचला होता. मात्र प्रवासादरम्यान त्याने बसमधील एका सहप्रवाशाचा मोबाईल घेऊन आपल्या वडिलांना फोन केला.

कर्नाटकातील खून प्रकरणातील आरोपी पुण्यात अटक; सहप्रवाशाच्या फोन कॉलने उलगडला गुन्हा
धनकवडी : कर्नाटकातील तुमकुर जिल्ह्यात घडलेल्या खून प्रकरणातील आरोपी मधू याला पुण्यात नाट्यमय पद्धतीने अटक करण्यात आली. स्वतःचा मोबाईल बंद करून घरी ठेवत पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश मात्र एका सहप्रवाशाच्या मोबाईलवरून केलेल्या फोनमुळे झाला.
फोनकॉल ठरला महत्त्वाचा धागा
खून करून मुंबईकडे पळ काढण्यासाठी आरोपी मधू पुण्याजवळ पोहोचला होता. मात्र प्रवासादरम्यान त्याने बसमधील एका सहप्रवाशाचा मोबाईल घेऊन आपल्या वडिलांना फोन केला. या कॉलचे लोकेशन मिळताच कर्नाटक पोलिसांनी बस क्रमांक, ट्रॅव्हल एजन्सी आणि मार्गाची खातरजमा केली. त्यानंतर तात्काळ शर्मा ट्रॅव्हल्सशी संपर्क साधत बस ड्रायव्हरला आरोपीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. ड्रायव्हरकडून वेळोवेळी मिळणाऱ्या लोकेशनमुळे पथक आरोपीच्या मागावर होते.
कात्रज चौकात बस रोखली; सीट क्रमांक ५वरील आरोपी जेरबंद
पुणे शहर पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी स्थानिक पथकाला सतर्क केले. बस पुण्यात दाखल होणार असल्याची माहिती मिळताच कात्रज चौकात अंमलदार रवींद्र भोरडे यांना बस थांबवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. बुधवारी (३ जानेवारी) सकाळी दहाच्या सुमारास बस कात्रज येथे पोहोचताच भोरडे यांनी ती अडवली आणि सीट क्रमांक ५ वर बसलेला आरोपी मधू याला ओळखून ताब्यात घेतले.
१ लाखांच्या आर्थिक वादातून खून
तपासात उघड झाले की, मृत महिला मंजुळा आणि आरोपी मधू यांच्यामध्ये एक लाख रुपयांच्या देणगीबाबत वाद सुरू होता. पैसे परत देण्याच्या मागणीवरून संतापलेल्या मधूने मंजुळाच्या गळा आणि पोटावर वार करून तिची हत्या केली. अटकेनंतर आरोपीला भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी शिवाजीनगर सत्र न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड मिळवून आरोपीला पुढील तपासासाठी कर्नाटकात घेऊन गेले. ही कारवाई कर्नाटक आणि पुणे पोलिसांच्या समन्वयातून वेगवान आणि परिणामकारक ठरल्याची प्रशंसा होत आहे.