नारायणगावात १०.२७५ किलो गांजासह आरोपीस अटक, १.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 20:13 IST2025-08-12T20:12:06+5:302025-08-12T20:13:13+5:30
संशयिताला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्या मोटारसायकलच्या मागील बाजूस पोत्यात भरलेला १०.२७५ किलो गांजा आढळला.

नारायणगावात १०.२७५ किलो गांजासह आरोपीस अटक, १.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
नारायणगाव : नारायणगाव-मांजरवाडी रोडवर मोटारसायकलवरून गांजा विक्रीसाठी जात असलेल्या आरोपीस पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून १,०२,५०० रुपये किमतीचा १०.२७५ किलो गांजा आणि दुचाकी असा एकूण १,३२,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
अटक करण्यात आलेला आरोपी मुनवर अली सय्यद (वय ४८, रा. कोतुळ, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) असून, त्याला नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक फौजदार दीपक साबळे, हवालदार संदीप वारे आणि अक्षय नवले हे जुन्नर विभागात गस्त घालत असताना, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मुनवर सय्यद हा मोटारसायकलवरून नारायणगाव-मांजरवाडी रोडवर गांजा विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पथकाने नारायणगाव पोलिस ठाण्याच्या पोलिसांसह सापळा रचला. संशयिताला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्या मोटारसायकलच्या मागील बाजूस पोत्यात भरलेला १०.२७५ किलो गांजा आढळला. गांजा आणि मोटारसायकल असा एकूण १,३२,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, राजू मोमीन, तसेच नारायणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, दडस पाटील, मंगेश लोखंडे, सोमनाथ डोके आणि सत्यम केळकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.