भरधाव कार अचानक पेटली; पाटसजवळ कार जळून खाक,दोघे प्रवासी थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 20:29 IST2026-02-27T20:29:13+5:302026-02-27T20:29:28+5:30
- पाटस-दौंड रस्त्यावर पाटसकडून दौंडकडे जात असलेल्या कारने गार फाट्याच्या जवळ पेट घेतला.

भरधाव कार अचानक पेटली; पाटसजवळ कार जळून खाक,दोघे प्रवासी थोडक्यात बचावले
पाटस (ता. दौंड): पाटस–दौंड मार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या कारला अचानक आग लागल्याची घटना आज सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली असली, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटसकडून दौंडकडे जाणारी कार गार फाट्याजवळ पोहोचताच अचानक धुराचे लोट निघू लागले आणि क्षणात गाडीने पेट घेतला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गाडीत असलेले दोघे प्रवासी तात्काळ खाली उतरले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील युवकांनी धाव घेत गाडीवरील आग विझवण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा सतत मारा केल्याने आग नियंत्रणात आली. घटनास्थळापासून काही अंतरावर पेट्रोल पंप असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता होती; मात्र वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे पाटस–दौंड रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, कारला आग लागण्यामागे शॉर्टसर्किट कारणीभूत असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अधिक तपास सुरू आहे.
