पारंपरिक दसऱ्यामध्ये ७७ वर्षीय पुजाऱ्याने ओढल्या १२ मानाच्या गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 17:59 IST2025-10-03T17:58:32+5:302025-10-03T17:59:16+5:30
जारकरवाडी गावात अनेक वर्षांपासून बिरोबा महाराजांचा उत्सव नवरात्र महोत्सवाच्या रूपात साजरा केला जातो

पारंपरिक दसऱ्यामध्ये ७७ वर्षीय पुजाऱ्याने ओढल्या १२ मानाच्या गाड्या
मंचर : आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी गावात नवरात्र महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने दसरा सण साजरा करण्यात आला. या सोहळ्यात ७७ वर्षीय बिरोबा देवाचे पुजारी गणपत मंचरे यांनी कमरेला दोरी बांधून १२ मानाच्या बैलगाड्या ओढल्या. हा भव्य सोहळा पाहण्यासाठी स्थानिकांसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
जारकरवाडी गावात अनेक वर्षांपासून बिरोबा महाराजांचा उत्सव नवरात्र महोत्सवाच्या रूपात साजरा केला जातो. आधुनिक नवरात्रीच्या गर्दीतही गावकरी ज्येष्ठ-तरुण एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा करतात. एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक गोष्टी मागे पडत असताना, जारकरवाडी ग्रामस्थांनी सामाजिक-धार्मिक प्रबोधनासाठी विविध महाराजांच्या श्रवणीय वाणीतून अखंड १० दिवस कीर्तनसेवा आयोजित केली. अध्यात्म आणि विज्ञान यांचा मेळ घालून हा उत्सव साजरा करण्यात आला.
दररोज महाआरती, महाप्रसाद व रात्री सर्वाक्ष धनगरी ओव्या सादर केल्या गेल्या. दसऱ्याच्या संध्याकाळी गजी नृत्याचा कार्यक्रम झाला. तसेच, मयूर सरडे व प्रतीक्षा भांड यांनी ‘खेळ रंगला पैठणीचा’ अर्थात ‘मीच होणार होम मिनिस्टर’ हा रंजक कार्यक्रम सादर केला. दसऱ्याच्या दिवशी सर्व भाविकांच्या उपस्थितीत देवाची आरती झाली तसेच उपस्थितांना अन्नप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या सोहळ्याला दौलत लोखंडे, रामचंद्र ढोबळे, उद्योजक रमेश लबडे, ॲड. रूपाली भोजने, सरपंच प्रतीक्षा बढेकर, उपसरपंच सचिन टाव्हरे, उपसरपंच सुवर्णा भांड, जिल्हाप्रमुख सुरेश भोर, भाजप तालुकाध्यक्ष किरण वाळुंज, पूजा वळसे, सुरेखा निघोट, रामहरी देवडे, दत्ताराम वैद्य, खंडू भोजने यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन कचरदास भोजने, उत्तम मंचरे, रवींद्र भांड, नवनाथ मंचरे, अविनाश तागड, दीपक पाचपुते, मंगेश भोसले, सत्यवान भोसले, अविनाश पवार, एकनाथ भांड, गोरक्षनाथ भांड, पोपट भोजने यांनी केले, तर सूत्रसंचालन निवृत्ती भांड, भागाजी भांड व प्रतीक्षा भांड यांनी केले.
४० वर्षांपासून परंपरा
मानाच्या गाड्या कमरेला दोरी बांधून ओढण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. १२ बैलगाड्या एका दोरीने बांधल्या जातात. पहिल्या गाडीला दोरी बांधून ती पुजारी गणपत मंचरे यांच्या कमरेला जोडली जाते. वाद्यांच्या निनादात मंचरे हे दीडशे फूट अंतरापर्यंत या १२ गाड्या सहज ओढत नेतात. गेल्या ४० वर्षांपासून मंचरे ही परंपरा निभावत आहेत, अशी माहिती नवनाथ मंचरे यांनी दिली.