आढळराव पाटील यांच्यासह ६७ बैलगाडा मालकांची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 19:23 IST2025-05-18T19:23:16+5:302025-05-18T19:23:46+5:30

- एकूण ६७ बैलगाडा मालक व शेतकऱ्यांच्या विरोधात मंचर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.

pune news 67 bullock cart owners including Adhalrao Patil acquitted | आढळराव पाटील यांच्यासह ६७ बैलगाडा मालकांची निर्दोष मुक्तता

आढळराव पाटील यांच्यासह ६७ बैलगाडा मालकांची निर्दोष मुक्तता

अवसरी : उत्तर पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या बैलगाडा शर्यती बंद पडल्या होत्या. शर्यती पूर्ववत सुरू व्हाव्यात या मागणीसाठी २० वर्षापूर्वी मंचर येथे केलेल्या आंदोलनामुळे माझ्यासह माजी खासदार (स्व) किसनराव बाणखेले व  एकूण ६७ बैलगाडा मालक व शेतकऱ्यांच्या विरोधात मंचर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. खेड सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस.सय्यद यांनी शनिवारी (दि.१७) सबळ पुराव्या अभावी माझ्यासह सर्व बैलगाडा मालकांची निर्दोष मुक्तता केली आहे. शेतकरी बांधवांना न्याय मिळाला आहे.असे म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

यावेळी बैलगाडा मालक व आढळराव पाटील यांनी एकमेकांना पेढे भरून जल्लोष  साजरा केला.यावेळी भैरवनाथ पतसंस्थेचे व्हॉईस चेअरमन सागर काजळे,पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र करंजखेले, सुनील बाणखेले,शिवाजी राजगुरू आदी उपस्थित होते. 
   
यावेळी आढळराव पाटील म्हणाले,सन २००५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात बैलगाडा मालक व शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व मी व किसनराव बाणखेले यांनी केले होते.वीस वर्षात मी ६७ वेळा न्यायालयात हजर राहिलो.सर्व आंदोलक शेतकरी न्यायालयात एकाच वेळी हजर राहणे जमत नव्हते त्यामुळे  खटला लांबणीवर पडला.मी पुढाकार घेतला.सर्वांची ओळख परेड झाली सबळ पुराव्या अभावी आमची निर्दोष मुक्तता झाली.२० वर्षानंतर आमच्या लढ्याला यश आले. 

खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे नाव न घेता आढळराव पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली.आढळराव पाटील म्हणाले “घोडीवर बसून अनेकांनी दावे केले की माझ्यामुळे बैलगाडा शर्यती सुरू झाल्या.पण त्यात अजिबात तथ्य नाही.शर्यतीसाठी कोणाचा किती त्याग आहे. हे जनतेसमोर आहे.मी अनेक बैलगाडा घाटात उपस्थित असतो.

सध्या बैलगाडा शर्यतीला बाजारो स्वरूप आले आहे का ? या प्रश्नाला उत्तर देताना आढळराव पाटील म्हणाले, “उच्च न्यायालयाने व प्रशासनाने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे. त्यासाठी अनेक निकष आहेत.बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी रुग्णवाहिका व पशुवैद्यकीय अधिकारी असणे बंधनकारक आहे. पण प्रत्यक्षात काहीच नसते तसेच देवाच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीऐवजी वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यती भरविल्या जातात.प्रशासन नियमाकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत जर पेटासारख्या संस्था पुन्हा कोर्टात गेल्या. तर बैलगाडा शर्यती पुन्हा अडचणीत येऊ शकतात.त्यासाठी सर्वांनी न्यायालय व शासनच्या आदेशाची अंमलबजावणी करावी.” 

-बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात. म्हणून अनेकदा मी लोकसभेत प्रश्न धसास लावला. तसेच अनेकदा आंदोलन केली. 
-तीन खटले माझ्या विरोधात दाखल झाले. त्यापैकी एका खटल्यातून निर्दोष मुक्ताता झाली आहे. 
-गुन्हा दाखल झालेल्यांपैकी १५ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी  सर्व गुन्हा दाखल झालेल्यांची ओळखपत्र कोर्टाने घेतली. त्यानंतर कोर्टाने निकाल दिला. 
-अँड गणेश होनराव, अँड मृणाल पडवळ, अँड.सोनम नाईकरे,अँड. कोमल बहिरट या कायद्यातज्ञांची विशेष सहकार्य लाभले. 

Web Title: pune news 67 bullock cart owners including Adhalrao Patil acquitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.