भोर तालुक्यात चार वर्षांत ५०२२ श्वानदंश; सीरम लस उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 10:09 IST2025-10-05T10:08:36+5:302025-10-05T10:09:51+5:30
- उपजिल्हा रुग्णालयात लस मिळते, पण गंभीर केससाठी ससूनला धाव

भोर तालुक्यात चार वर्षांत ५०२२ श्वानदंश; सीरम लस उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड
भोर : तालुक्यात मागील चार वर्षांत ५०२२ जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावले, तरी उपजिल्हा रुग्णालयात अँटी रेबीज सीरम उपलब्ध नसल्याने रुग्णांना ससून रुग्णालय किंवा खाजगी दवाखान्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. लस उपलब्ध असली तरी गंभीर चाव्यांसाठी आवश्यक असलेले सीरम नसल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा त्रास होत असल्याचे समोर आले आहे.
भोर शहरातील रामबाग येथील ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय हे श्वानदंश व सर्पदंशाच्या प्रकरणांसाठी प्रमुख केंद्र आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून सीरमचा पुरवठा होत नसल्याचे प्रशासनाने कबूल केले. भोर, राजगड व मुळशी तालुक्यांत अशा घटना वारंवार घडतात, पण सीरम तीनही तालुक्यांत उपलब्ध नाही.
उपजिल्हा रुग्णालयातील आकडेवारीनुसार, वर्ष २०२३-२४ मध्ये १०२४ (उपजिल्हा) व ९४९ (तालुका वैद्यकीय अधिकारी) रुग्ण, २०२४-२५ मध्ये ११०३ व ७८४, तर २०२५-२६ मध्ये (सध्या साडेपाच महिन्यांत) ५१८ व ६४४ अशी एकूण ५०२२ रुग्णसंख्या आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय तिडके यांनी सांगितले, "सध्या भूतोंडे, जोगवडी, नसरापूर, भोंगवली, नेरे, आंबवडे व हिडोशी या सात प्राथमिक आरोग्य केंद्रांत व २७ उपकेंद्रांत लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. आपला दवाखान्यांतही पुरवठा होतो; मात्र सीरम तज्ज्ञांच्या देखरेखीखाली लस दिली जाते, जे उपजिल्हा रुग्णालयात नाही."
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश गुडे म्हणाले, "लस रोग प्रतिबंध करते, तर सीरम तत्काळ संरक्षण देते. गंभीर चाव्यांसाठी सीरम आवश्यक असते. जिल्हा रुग्णालयाकडे मागणी करतो, पण पुरवठा होत नाही. लस दिल्यानंतर समस्या उद्भवल्यास तत्काळ पुढील उपचार गरजेचे आहेत."
डॉक्टरांनी सांगितले, कुत्रा, मांजर, कोल्हा किंवा वटवाघूळ चावल्यास रेबीजचा धोका असतो. सामान्य चाव्यासाठी लस पुरेशी, पण गंभीर केससाठी सीरम प्रभावी. जिल्हा प्रशासनाने तत्काळ पुरवठा सुरू करण्याची मागणी वाढत आहे.