पुणे जिल्ह्यात २२ लाख खात्रीशीर मतदार, विशेष पुनरीक्षण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 11:19 IST2026-03-29T11:17:44+5:302026-03-29T11:19:38+5:30

जिल्ह्यात २२ लाख खात्रीशीर मतदार, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वी केलेल्या पडताळणीत स्पष्ट

Pune news 22 lakh confirmed voters in Pune district, special review underway | पुणे जिल्ह्यात २२ लाख खात्रीशीर मतदार, विशेष पुनरीक्षण सुरू

पुणे जिल्ह्यात २२ लाख खात्रीशीर मतदार, विशेष पुनरीक्षण सुरू

पुणे : राज्यातील सर्वाधिक ९१ लाख ६० हजार मतदार असलेल्या पुणे जिल्ह्यात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या मतदारांच्या दोन याद्यांच्या पडताळणीचे काम सुमारे २५ टक्के पूर्ण झाले आहे. पडताळणी झालेल्या एकूण मतदारांची संख्या सुमारे २२ लाख असून, या मतदारांना एप्रिलमध्ये होऊ घातलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याची गरज नाही.

ज्या मतदारांची नावे पुणे जिल्ह्यात २००२ च्या यादीत नाहीत, अशा मतदारांनी २००२ मध्ये ज्या ठिकाणच्या यादीत नावे आहेत, याचा पुरावा काढून ठेवावा, जेणेकरून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना पडताळणी करणे सोपे होईल, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह २२ राज्यांमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला मान्यता दिली आहे. हा कार्यक्रम प्रत्यक्षात एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. त्यानुसार राज्यातील २०२५ मधील मतदार यादीची पडताळणी २००२ च्या मतदार यादीशी करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातही अशी पडताळणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात २०२५ च्या मतदार यादीनुसार ९१ लाख ५९ हजार ५९८ मतदार आहेत. त्यानुसार २००२ च्या तसेच २०२५ च्या मतदार यादीत नाव पुणे जिल्ह्यातच असलेल्या मतदारांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत २२ लाख २१ लाख ९६१ मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. एकूण मतदार संख्येच्या हे प्रमाण २४.२६ टक्के इतके आहे. यात बारामती मतदारसंघ आघाडीवर आहे. या मतदारांना चिन्हांकित करण्यात येत असून, चिन्हांकित मतदार अंतिम असल्याचे गृहित धरण्यात येतील.

जिल्ह्यात बारामती मतदारसंघात हे काम आघाडीवर असून, यानंतर भोर व आंबेगाव मतदारसंघांचा क्रमांक आहे. पुणे शहरात कसबा पेठ मतदारसंघात पडताळणी झालेल्या मतदारांचे काम अधिक आहे. या पडताळणीसाठी केंद्रस्तरीय अधिकारी त्यांच्या मतदान केंद्राच्या हद्दीतील मतदारांशी फोनवरून व प्रत्यक्ष संपर्क साधत आहेत. मतदारांनी २००२ च्या यादीचा पुरावा दिल्यास पडताळणीचे काम पूर्ण होत आहे. फोनवरूनही मतदारांशी संपर्क साधून ही पडताळणी केली जात आहे. त्यामुळे मतदारांनी या अधिकाऱ्यांना प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कळसकर यांनी केले आहे. काही मतदार या अधिकाऱ्यांच्या फोनला प्रतिसाद देत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रतिसाद न दिल्यास या मतदारांच्या नावाची पडताळणी करणे शक्य होणार नाही. प्रत्यक्ष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमावेळी त्यांना मतदार यादीत नाव कायम ठेवण्यासाठी कागदोपत्री पुरावे सादर करावे लागणार आहेत.

जे मतदार २००२ च्या मतदार यादीत त्याच मतदारसंघात नाहीत अशांना अन्य मतदारसंघात नाव असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. मतदार यादीत नाव नसल्यास आई-वडिलांचे, आजोबांचे किंवा पणजोबांचे नाव असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. २००२ नंतर जन्मलेल्या मतदारांना गणना अर्ज भरताना जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला द्यावा लागणार आहे. तसेच २००२ मध्ये मतदार ज्याठिकाणी होता, त्या ठिकाणाचा रहिवासाचा पुरावा द्यावा लागणार आहे.

अधिकाऱ्यांकडून या प्रमाणपत्राची पडताळणी केली जाणार आहे. ही कागदपत्रे योग्य आहेत, असे निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांचे मत झाल्यानंतरच त्याचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यासाठी सुनावणीचा पर्याय देण्यात आला आहे. त्यावेळी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे, अन्यथा अशा मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. ज्या जिल्ह्यात एखाद्या मतदाराची पडताळणी पूर्ण झाल्यास त्याचे पूर्वी ज्या मतदारसंघात नाव आहे, अशा ठिकाणच्या मतदार यादीतून त्याचे नाव त्याठिकाणी पडताळणी नसल्याने आपोआपच बाद होणार आहे. 

Web Title : पुणे जिला: 22 लाख सत्यापित मतदाता, विशेष पुनरीक्षण जारी

Web Summary : पुणे जिले में विशेष पुनरीक्षण कार्यक्रम के लिए 22 लाख मतदाताओं का सत्यापन हुआ। 2002 की सूची में नहीं होने वालों को पहले के नामांकन का प्रमाण चाहिए। उद्देश्य 2025 की मतदाता सूची को अपडेट करना है। बारामती सत्यापन में आगे, नागरिकों से सहयोग का आग्रह किया गया।

Web Title : Pune District: 2.2 Million Verified Voters, Special Revision Underway

Web Summary : Pune district verifies 2.2 million voters for special revision program. Those not in the 2002 list need proof of prior enrollment. The drive aims to update the 2025 voter list, ensuring accuracy. Baramati leads in verification progress; citizens urged to cooperate.