Navale Bridge :'ही' वेग मर्यादा पाळणे बंधनकारक अन्यथा...;आठवड्यातच बदलली भूमकर चौक ते नवले पूल वेगमर्यादा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:26 IST2025-12-05T15:24:53+5:302025-12-05T15:26:35+5:30
Navale Bridge Speed Limit: जांभूळवाडी येथील दरी पूल ते नवले पूल या दरम्यान तीव्र उतार असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडतात.

Navale Bridge :'ही' वेग मर्यादा पाळणे बंधनकारक अन्यथा...;आठवड्यातच बदलली भूमकर चौक ते नवले पूल वेगमर्यादा
पुणे : मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी जांभूळवाडी येथील दरी पूल ते नवले पूल परिसरासाठी वाहतूक पोलिसांनी वाहनांची वेगमर्यादा ताशी ३० किलोमीटर केला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करून वाहतूक पोलिसांनी अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र हा निर्णय आठवड्यात बदलण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. नवीन निर्णयानुसार वाहनांचा ताशी वेग ३० वरून आता ४० किलोमीटर करण्यात आला आहे.
जांभूळवाडी येथील दरी पूल ते नवले पूल या दरम्यान तीव्र उतार असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडतात. हे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र अपघाताच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही. गेेल्या महिन्यात भीषण अपघातात आठ जणांचा बळी गेला. त्यानंतरही एक ते दोन गंभीर अपघात झाले. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी सुरक्षा उपायांचा आढावा घेतला.
त्यानंतर तातडीचा उपाय म्हणून तीव्र उतार आणि अपघात प्रवण क्षेत्रात वाहतुकीची वेगमर्यादा कमी करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार गेल्या आठवड्यात वेगमर्यादा ताशी ३० किलोमीटर करण्यात आली होती. उताराच्या रस्त्यावर एवढी वेगमर्यादा कमी केल्याने अपघाताचा धोका वाढतो, असा दावा वाहतूकदारांनी केला होता. आता वाहतूक पोलिसांनी वेगमर्यादेबाबत गुरुवारी नवीन आदेश काढून वेगमर्यादा ताशी ४० कि. मी. करीत असल्याचे स्पष्ट केले.
गेल्या आठवड्याभरात ताशी ३० कि. मी. एवढी वेगमर्यादा होती. या काळात पाहणी केल्यानंतर वेगमर्यादेत सुधारणा करणे गरजेचे वाटले. त्यानुसार ताशी ४० कि. मी. वेगमर्यादा केली आहे. येथील अपघात कमी व्हावेत, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. - मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त