महापालिका म्हणते, "शहरात केवळ २० अनधिकृत होर्डिंग"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 13:05 IST2025-05-27T12:32:37+5:302025-05-27T13:05:05+5:30
शहरात २,६३८ अधिकृत होर्डिंग्ज; अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा; अनधिकृत होर्डिंग्जवर होत नाही कारवाई; पन्नास हजार रुपयांच्या दंडाची तरतूद; परवाना नुतनीकरणाकडे होर्डिंग्ज मालकाचे साफ दुर्लक्ष

महापालिका म्हणते, "शहरात केवळ २० अनधिकृत होर्डिंग"
- हिरा सरवदे
पुणे : शहरातील सर्वच रस्त्यांना धोकादायक होर्डिंग्जचा विळखा असताना महापालिकेच्या लेखी नाममात्र शहरात केवळ २० अनधिकृत होर्डिंग्ज आहेत. याबाबत परवाना व आकाशचिन्ह विभागाने लेखी माहिती दिली असून, शहरात २,६३८ अधिकृत होर्डिंग्ज असल्याचेही त्यात म्हटले आहे. या माहितीमुळे प्रशासन अनधिकृत होर्डिंग्जकडे जाणीवपूर्वक डोळेझाक तर करत नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे.
महापालिका हद्दीत कोठेही होर्डिंग्ज किंवा फ्लेक्स उभे करण्यासाठी परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून सशुल्क परवानगी दिली जाते. महापालिकेने परवानगी दिलेल्या होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची व दरवर्षी परवान्याचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी संबंधित होर्डिंग मालकावर असते. मात्र, महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता शहरातील विविध रस्ते, चौक, पदपथ, इमारती आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे होर्डिंग आणि फ्लेक्स उभारले जातात. यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडते. अशा बेकायदेशीर जाहीरातबाजीवर महापालिकेकडून कारवाई केली जाते. अनधिकृत होर्डिंग्जला ५० हजार रुपये तर अनधिकृत फ्लेक्स व जाहिरात फलकाला प्रत्येकी एक हजार रुपये दंड केला जातो. मात्र, अधिकारी, कर्मचारी आणि व्यावसायिकांचे लागेबांधे आणि त्याला मिळणारे राजकीय पाठबळ यामुळे कारवाईला लगाम लागतो. त्यामुळे शहरात अनधिकृत फ्लेक्सबाजी, जाहिरातबाजी आणि होर्डिंग्जचा आलेख दिवसेंदिवस वाढताच आहे. परिणामी, शहराचे विद्रुपीकरण होते.
सर्वाधिक अनधिकृत होर्डिंग्ज नगर रोडवर; पालिका म्हणते एकही नाही...
समाविष्ट गावांसह महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्जची संख्या असताना महापालिकेकडे केवळ २० अनधिकृत होर्डिंग्जची माहिती आहे. ही माहिती अतिक्रमण निरीक्षकांनी केलेल्या पाहणीनुसार नोंदवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे शहरातील सर्वाधिक अनधिकृत होर्डिंग्ज नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असताना महापालिकेच्या लेखी त्या परिसरात एकही अनधिकृत होर्डिंग्ज नाही. शहरात २६३८ अधिकृत होर्डिंग असून, सर्वाधिक अधिकृत ४९१ होर्डिंग्जची संख्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत दाखवण्यात आली आहे. तसेच १ जानेवारीपासून २४ मेपर्यंत ४६ अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली आहे.
अनधिकृत होर्डिंग्ज कुठे व किती
- येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय - ६
- हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालय - २
- वानवडी, रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय - ९
- कोंढवा, येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय - ३
होर्डिंग्ज कोसळून गेला होता चौघांचा बळी
मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात ५ ऑक्टोबर २०१८ रोजी लोखंडी होर्डिंग्जचा सांगाडा कोसळून निष्पाप ४ नागरिकांचा बळी गेला. तर, १० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रावेत येथे होर्डिंग कोसळून सहा नागरिकांना प्राण गमवावा लागला. या दुर्घटनेनंतरही पुणे महापालिकेने कारवाईची मोहीम हाती घेतली. मात्र, दोन्ही वेळा काही दिवसानंतर कारवाई गुंडाळण्यात आल्या.
नियमाला तिलांजली देऊन दिले परवाने
रस्त्याच्या कडेला, पदपथला लागून, दुकानांवर, इमारतींवर अनेक ठिकाणी मोठमोठे होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. रस्त्यांच्या कडेला किंवा चौकांमध्ये असलेल्या इमारतींच्या भिंतींना होर्डिंग्ज लटकत्या स्वरूपात आहेत. अशा होर्डिग्जला महापालिकेने परवानगी दिलेल्या पिवळ्या पाट्या लावलेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेनेच थांबा रेषेपासून २५ मीटर अंतर ठेवण्याच्या नियमाला तिलांजली दिल्याचे स्पष्ट होते.
खबरदारी घेण्याच्या सूचना
महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाने १४ मे रोजी शहरातील होर्डिंग्ज मालक व जाहिरातदारांची बैठक घेतली. या बैठकीत होर्डिंग्जची पाहणी करून होर्डिंग दुर्घटना घडणार नाही, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच गंज असल्यास रंग द्यावा, क्युआर कोडची पाटी तपासावी, फाटका फ्लेक्स पूर्ण काढवा, त्रुटी आढळल्यास एकमेकांना सांगून त्या दुरुस्त कराव्यात, असेही सांगितले आहे. - प्रशांत ठोंबरे, उपायुक्त, परवाना व आकाशचिन्ह विभाग, महापालिका