जिथे जवळचे नातेवाईकही 'आपलेपण' विसरले; तिथे पुणे महापालिकेने ३९७ कोरोना बाधितांचे मृतदेह उचलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 21:11 IST2020-06-01T21:11:01+5:302020-06-01T21:11:31+5:30

कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक मृतदेह घेण्यास येत नाहीत; तिथे महापालिकेचे कर्मचारी जीवावर उदार होत हे मृतदेह उचलत आहेत

Pune Municipal Corporation picked up 397 bodies of Corona victims | जिथे जवळचे नातेवाईकही 'आपलेपण' विसरले; तिथे पुणे महापालिकेने ३९७ कोरोना बाधितांचे मृतदेह उचलले

जिथे जवळचे नातेवाईकही 'आपलेपण' विसरले; तिथे पुणे महापालिकेने ३९७ कोरोना बाधितांचे मृतदेह उचलले

ठळक मुद्देकोरोनाच्या भीतीने मृतदेह उचलण्यास नकार देणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणार

पुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून पुण्यामध्ये ३०० पेक्षा अधिक कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. या मृतदेहांना जिथे जवळचे नातेवाईक हात लावायला तयार होत नाहीत, तिथे महापालिकेचे कर्मचारी जीवावर उदार होत हे मृतदेह उचलत आहेत. आजवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल २९७ बाधितांचे मृतदेह उचलले आहेत. 
शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असून त्यांचा मृत्युदर ५ टक्के आहे. हा मृत्युदर वाढू नये याकरिता पालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक मृतदेह घेण्यास येत नाहीत किंवा अंत्यविधी करण्यासाठी पालिकेवरच जबाबदारी टाकतात. अशावेळी हे मृतदेह उचलण्याची आणि त्यांच्यावर अंत्यविधी करण्याची जबाबदारी पालिका कर्मचाऱ्यांवर येते. 
आजवर पालिका कर्मचाऱ्यांनी २९७ कोरोनाबधितांचे मृतदेह स्मशानभूमीत पोहचविणे, अंत्यविधी करणे अशी कामे केली आहेत. यासोबतच ३ बेवारस मृतदेह आणि एका निगेटिव्ह रुग्णाचाही मृतदेह पालिका कर्मचाऱ्यांनी उचलत पुढील सोपस्कार पार पाडल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले. 

'त्या' कर्मचाऱ्यांची होणार चौकशी..
पाषाण येथील शांती निकेतन सोसायटीमध्ये मृत्यू झालेल्या अभियंत्याचा मृतदेह कोरोनाच्या भीतीने उचलण्यास नकार देणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (ज.) रुबल अगरवाल यांनी ही माहिती दिली. ही घटना शुक्रवारी घडली होती.
 शांतिनिकेतन सोसायटीमधील मूळच्या तमिळनाडू येथील एका अभियंत्याचा शुक्रवारी घरातच मृत्यू झाला होता. या अभियंत्याला मूत्रपिंड आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्यावर ऑनलाईन उपचार सुरू होते. उपचार घेत असतानाच त्यांच्या छातीमध्ये पाणी झाले होते. कोरोनासदृश लक्षणे असल्याने डॉक्टरांनी त्यांना कोरोना तपासणी करण्याचा सल्ला दिला होता. ही तपासणी करण्यापूर्वीच त्यांचा घरामध्ये मृत्यू झाला.
 त्यांचा मृतदेह उचलण्यास सोसायटीतील रहिवासी धजावत नव्हते. घटनास्थळी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचा?्यांनी पीपीई किट असूनही हा मृतदेह उचलण्यास नकार दिला होता. त्यामुळे पोलिसांनीच पीपीई किटा घालून हा मृतदेह नवव्या मजल्यावरून खाली आणत रुग्णवाहिकेमधून ससूनला पोचविला होता. या अभियंत्यांची मृत्यूपश्चात केलेली कोरोना तपासणी निवेटिव्ह आली होती. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात होती.
 त्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त (ज.) रुबल अगरवाल यांनी या प्रकरणाची आणि मृतदेह उचलण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करणार असल्याची माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी नकार देण्यामागे काही विशिष्ट कारण होते की घाबरून त्यांनी नकार दिला याचीही माहिती घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Pune Municipal Corporation picked up 397 bodies of Corona victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.