Pune: कुत्र्यांची आई आणि तिच्या पिलांना काठ्यांनी मारहाण; आदिनाथ सोसायटीतील दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 12:40 IST2024-09-01T12:40:23+5:302024-09-01T12:40:33+5:30
मुक्या प्राण्यांना, लहान पिलांना, दगडाने किंवा काठीने मारणे योग्य नाही, वकिलांची प्रतिक्रिया

Pune: कुत्र्यांची आई आणि तिच्या पिलांना काठ्यांनी मारहाण; आदिनाथ सोसायटीतील दोघांवर गुन्हा दाखल
पुणे : सातारा रस्त्यावरील प्रसिद्ध श्री आदिनाथ सोसायटीत कुत्र्याच्या पिलासह त्यांच्या आईला काठीने मारहाण करण्याची घटना घडली. ऐन पर्युषणच्या पावन पर्वात सोसायटीत राहणाऱ्या दोन सदस्यांनी हे धक्कादायक कृत्य केल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्यावर स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वकिलाच्या तत्परतेमुळे मुक्या प्राण्यांचा जीव वाचला.
भरतकुमार धनराज गांधी आणि हर्षद भरतकुमार गांधी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना बुधवारी २८ ऑगस्ट रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली. भरतकुमार गांधी आणि हर्षद गांधी हे दोघे कुत्र्यांची आई आणि तिच्या दोन पिलांना काठ्यांनी मारत होते. याची माहिती मिळताच प्राणिमित्र आणि पशुकल्याण समितीचे सदस्य ॲड. अमित शहा हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना कळवले आणि त्या प्राण्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळात स्वारगेट पोलिस ठाण्यातील पोलिस घटनास्थळी आले आणि त्यांनी भरत गांधी आणि त्यांचा मुलगा हर्षद गांधी या दोघांवर, प्राणी अत्याचार कायद्यांतर्गत आणि इतर कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला.
क्षुल्लक कारणावरून लहान पिलांना आणि त्यांच्या आईला मारणे, कितपत योग्य आहे, याचा विचार सगळ्यांनी करायला हवा. प्राण्यांनादेखील जगण्याचा अधिकार आहे. जर कुठली समस्या असेल, तर त्यावर शांतपणे, चर्चा करून तोडगा काढता येऊ शकतो; परंतु मुक्या प्राण्यांना, लहान पिलांना, दगडाने किंवा काठीने मारणे योग्य नाही. अबोल प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी नाइलाजाने कारवाई करावी लागते. -ॲड. अमित शहा