पीडितांची वैद्यकीय चाचणी एका दिवसातच होणे गरजेचे; पोलिस आयुक्तांनी महिला आयोगाकडे सुचवला उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 12:35 IST2025-04-08T12:32:29+5:302025-04-08T12:35:58+5:30
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेने महिला डॉक्टरने तिची तपासणी का केली नाही

पीडितांची वैद्यकीय चाचणी एका दिवसातच होणे गरजेचे; पोलिस आयुक्तांनी महिला आयोगाकडे सुचवला उपाय
पुणे : बलात्कार पीडितांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणीदरम्यान हेळसांड होत असल्याचा प्रकार समोर आला होता. स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर पीडितेने देखील वैद्यकीय चाचणीवेळी महिला डॉक्टरांची उपस्थिती गरजेची असल्याची मागणी केली होती. त्यातच पीडितांच्या वैद्यकीय चाचणीला ससून प्रशासनाकडून दोन ते तीन दिवस लागत असल्याने ही वैद्यकीय चाचणी एका दिवसातच पूर्ण करण्यात यावी, असा उपाय पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना सुचवला आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सोमवारी (दि. ७) सकाळी पुण्यातील महिला सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी पोलिस आयुक्तांनी शहरातील महिला सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजनांबरोबरच पीडितांना ससूनमध्ये वैद्यकीय चाचणीसाठी लागणारा वेळ यावर भूमिका स्पष्ट केली.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेने महिला डॉक्टरने तिची तपासणी का केली नाही हा मुद्दा पुढे आणल्यानंतर पोलिस आयुक्तांनीही याला तेवढेच महत्त्व दिले आहे. ससून रुग्णालयात पीडितांची वैद्यकीय तपासणी करताना ही तपासणी महिला डॉक्टरांकडूनच करण्यात यावी. त्या ठिकाणी महिला डॉक्टर आणि नर्स उपलब्ध असाव्यात. महिला डॉक्टर नसेल तर दुसऱ्या रुग्णालयातून बोलवून पीडितांनी वैद्यकीय चाचणी व्हावी. पीडितांवर करण्यात येणारे उपचार आणि त्यांची होणारी वैद्यकीय चाचणी ही वेगवेगळी ठेवावी. या ठिकाणीही महिला डॉक्टर्स आणि नर्स उपलब्ध असाव्यात, असे उपाय आयुक्तांनी सुचवले आहेत.
२८४ ठिकाणी स्ट्रीट लाइट
महिला सुरक्षेच्या दृष्टीने बोपदेव घाटासह गुन्ह्यांचे हॉटस्पॉट आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. शहरातील २८४ ठिकाणी स्ट्रीट लाइट बसवण्याचे प्रस्तावित असल्याचेही आयुक्तांनी सुरक्षेच्या आढावा बैठकीत महिला आयोगाच्या अध्यक्षांना माहिती दिली.