Pune Mayor: अजित दादांच्या जाण्याने केवळ पुण्याचे नाही तर राज्याचे नुकसान; पुण्याच्या सर्वपक्षीय नगरसेवकांची श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 14:11 IST2026-02-10T14:10:56+5:302026-02-10T14:11:18+5:30
Pune Mayor काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा नेता, चुकीच्या गोष्टी घडल्यानंतर जाहीरपणे सुनावणारा नेता, अतिशय स्पष्टपणे बोलणारे, अशी ओळख उपमुख्यमंत्री अजित पवार यांची होती

Pune Mayor: अजित दादांच्या जाण्याने केवळ पुण्याचे नाही तर राज्याचे नुकसान; पुण्याच्या सर्वपक्षीय नगरसेवकांची श्रद्धांजली
पुणे : स्पष्टवक्ते, वेळ पाळणारा नेता, विकासासाठी सतत झटणारा, कार्यकर्ता, पदाधिकारी कोणत्याही पक्षाचा असो काम करताना कोणताही भेदभाव न करणारा नेता, अशी ओळख उपमुख्यमंत्री अजित पवार यांची होती. त्यांच्या अचानक जाण्याने केवळ पुणे शहराचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे मोठे नुकसान झाले आहे, अशा भावना व्यक्त करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अजित पवार यांना शब्दरूपी श्रद्धांजली अर्पण केली.
चार वर्षांच्या प्रशासक राजवटीनंतर सोमवारी महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महापालिकेची पहिली मुख्यसभा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह माजी खासदार सुरेश कलमाडी, हमाल पंचायत, कष्टकरी कामगार समाजाचे ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, मोहनसिंग राजपाल, रजनी त्रिभुवन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी अजित पवार यांच्यासह इतर मान्यवरांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी माजी महापौर प्रशांत जगताप, निवृत्ती बांदल, सूरज लोखंडे, प्रतीक कदम, अजित घुले, सुहास टिंगरे, गौरव घुले, हर्षवर्धन मानकर, स्वप्निल दुधाणे, नंदिनी धेंडे, स्मिता कोंढरे, हेमलता मगर, सुरेखा कवडे, प्रिया गदादे, रेखा टिंगरे, दत्ता बहिरट, बाबूराव चांदेरे, अमोल बालवडकर, वैशाली बनकर, अरविंद शिंदे, निवेदिता एकबोटे, सिद्धी शिळीमकर, प्रसन्न जगताप, पुनीत जोशी, अविनाश साळवे, सायली वांजळे, गणेश कल्याणकर, संदीप बेलदरे, जय खेडेकर, धीरज घाटे, नितीन गावडे, अनिता इंगळे, काका चव्हाण, चंदू कदम आदींनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादीचे गटनेते नीलेश निकम म्हणाले, काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा नेता, चुकीच्या गोष्टी घडल्यानंतर जाहीरपणे सुनावणारा नेता, अतिशय स्पष्टपणे बोलणारे, अशी ओळख उपमुख्यमंत्री अजित पवार यांची होती. पदे देताना कधीही त्यांनी भेदभाव केला नाही. वशिलेबाजी करून त्यांनी कधीही पदे दिली नाहीत. तरुणांच्या गळ्यातील अजित पवार हे आपल्यातून निघून गेले.
भाजप सभागृहनेते गणेश बीडकर म्हणाले, ‘अजितदादा पवार हे विकासाचा ध्यास घेतलेले, जनतेसाठी सतत झटणारे लोकनेते होते. पुणे शहराच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. पुणे फेस्टिव्हल खऱ्या अर्थाने सुरेश कलमाडी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार या पुणे शहरात पुणे फेस्टिव्हलमुळे आले. त्यांच्या जाण्याने पुणे शहराचे मोठे नुकसान झाले.
उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणाले, संकटावर मात करणारा माणूस म्हणजे अजित पवार हे होते. अजित पवार हे आपल्यातून निघून गेले. आजही मन मानायला तयार होत नाही. त्यांच्या प्रशासनावर असलेल्या पकडीमुळेच पुण्यातील, राज्यातील अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत.
महापौर मंजूषा नागपुरे म्हणाल्या, अजित पवार यांच्या बरोबर २०१२ साली जिल्हा नियोजन समितीवर काम करण्याची संधी मिळाली. जवळपास ५ वर्षे कामे केले. पुणे शहराचा विकास करताना नेहमी अजित पवार यांच्या कामाचा झपाटा लक्षात येतो.
अजित पवार यांच्या स्मृती कायम उजळत राहणार
महापालिकेत अजित पवार यांचे कायम स्मरण व्हावे, यासाठी सभागृह नेते गणेश बीडकर यांच्या वतीने महापालिकेस अजित पवार यांचे तैलचित्र भेट देण्यात आले. हे तैलचित्र नवनिर्वाचित महापौर मंजूषा नागपुरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. हे तैलचित्र महापालिकेत लावण्यात येणार आहे.