महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसांसह अन्य १०० पदाधिकारी देणार राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 15:41 IST2025-03-16T15:40:29+5:302025-03-16T15:41:45+5:30
काँग्रेस पक्षातील अन्य १०० पदाधिकारी देखील येत्या २-३ दिवसात राजीनामा देणार

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसांसह अन्य १०० पदाधिकारी देणार राजीनामा
पुणे : राज्यभर सध्या पक्षांतराचे वारे जोरात वाहत आहेत. त्यात पुणे देखील मागे राहिलेले नाही. नुकताच गेल्या काही दिवसांपूर्वी कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता काँग्रेसला देखील गळती लागल्याची चर्चा शहरात आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील व एनएसयुआय पुणे सरचिटणीस कृष्णा साठे यांच्यासह पक्षातील अन्य १०० पदाधिकारी देखील येत्या २-३ दिवसात राजीनामा देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील पदाधिकारी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करताना राज्यभर दिसून येत आहेत. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अथवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच सुरवसे पाटील हे काँग्रेस पक्षाला रामराम ठोकणार अशी बातमी समोर आली होती.
आता पक्षप्रवेशाची तारीख निश्चित झाली असून, येत्या २ ते ३ दिवसांमध्ये सुरवसे पाटलांसह युवक काँग्रेसचे १०० पदाधिकारी राजीनामा देत दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. विश्वसनीय सुत्रांनुसार येत्या आठवड्यात या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.