लोकसंख्या, सदस्यसंख्या बदलल्याने 'इच्छुकांना' पालिकेत बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:45 IST2025-06-12T11:44:54+5:302025-06-12T11:45:29+5:30

२०२२ च्या नियोजनापेक्षा सदस्यसंख्या आठने घटली-प्रभाग रचनेसाठी सॅटेलाईट, गुगलअर्थचा होणार वापर; पालिका निवडणूक विभागप्रमुख प्रसाद काटकर यांची माहिती

pune mahanagar palika election 2025 Because politics: 'Aspirants' will be hit in the municipality due to changes in population and member numbers | लोकसंख्या, सदस्यसंख्या बदलल्याने 'इच्छुकांना' पालिकेत बसणार फटका

लोकसंख्या, सदस्यसंख्या बदलल्याने 'इच्छुकांना' पालिकेत बसणार फटका

पुणे : महाविकास आघाडीचे सरकार असताना २०२२ मध्ये त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार पुणे महापालिकेत १७३ सदस्य निश्चित केली होती. मात्र, महायुती सरकारने चार सदस्यीय प्रभागरचनेचा पर्याय स्वीकारल्याने आणि लोकसंख्येचा निकष बदलल्याने सदस्यसंख्या आठने कमी होणार आहे. याचा फटका इच्छुकांना बसणार असून सदस्यसंख्या १६५ राहील दरम्यान, गुगल मॅप आणि गुगल अर्थचा वापर करून प्रभागांची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख व उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य शासनाने मंगळवारी राज्यातील २९ महापालिकांना आगामी निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. महाविकास आघाडीने २०२२ मध्ये त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळच्या प्रभाग रचनेमध्ये समाविष्ट ३४ गावांचा समावेश होता. त्यावेळी ३५ लाख ५६ हजार ८२४ लोकसंख्या निश्चित करून सदस्यसंख्या १७३ आणि प्रभाग संख्या ५८ निश्चित केली होती. आता फुरसुंगी व उरुळी देवाची ही गावे वगळून ३४ लाख ८१ हजार ३५९ लोकसंख्या आणि १६५ सदस्यसंख्या निश्चित करण्यात आली आहे. महायुती सरकारने चारसदस्यीय प्रभागरचना स्वीकारल्याने ३१ लाख लोकसंख्येसाठी १६१ सदस्य व पुढील प्रत्येक एक लाख लोकसंख्येसाठी एक सदस्य असा बेस निश्चित केला. त्यामुळे सदस्यसंख्या आठने कमी होणार आहे.

महापालिकेच्या जुन्या हद्दीमध्ये सहा हजार ४०० प्रगणक गट आहेत. हे गट न फोडता नगरविकास विभागाने दिलेल्या गाइडलाइन्सप्रमाणे नाले, ओढे, नदी, डोंगर या नैसर्गिक सीमारेषांसोबतच मोठे रस्ते यांच्या सीमारेषा ग्राह्य धरून गुगल मॅप आणि गुगल अर्थचा वापर करून प्रभागरचना निश्चित केली जाणार आहे. समाविष्ट गावांच्या प्रगणक गटांची यादी अद्याप उपलब्ध झालेली नाही. ती जिल्हा प्रशासनाकडून लवकरच मिळेल. पारदर्शकतेसाठी प्रगणक गटांची माहिती पालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध केली जाईल, असे काटकर यांनी नमूद केले.

आकडेवारी काय सांगते.....

पुणे महापालिका २०१७ ची परिस्थिती
लोकसंख्या - ३१ लाख ३२ हजार १४३
मतदार संख्या - २६ लाख ३४ हजार ८००
चार सदस्यीय प्रभाग रचना
सदस्य संख्या - १६२, अकरा गावे समाविष्ट झाल्यानंतर २ सदस्यांची भर पडून १६४ सदस्य.
प्रभाग संख्या - चार सदस्यीय ३९ व त्रिसदस्यीय २ प्रभाग. समाविष्ट ११ गावांचा लोकसंख्येनुसार दोन सदस्यीय एक प्रभाग.
मतदान केंद्र - ३ हजार ४३१
इव्हीएमची संख्या - ३ हजार ७००
खर्च २० कोटी ६७ लाख रुपये.

पुणे महापालिकेची २०२२ ची परिस्थिती

लोकसंख्या (समाविष्ट ३४ गावांसह) -
३५ लाख ५६ हजार ८२४
तीन सदस्यीय प्रभाग रचना
सदस्य संख्या - १७३
प्रभाग संख्या - ५८

सध्याची परिस्थिती -

लोकसंख्या (फुरसुंगी व उरुळी देवाची वगळून) - ३४ लाख ८१ हजार ३५९
चार सदस्यीय प्रभाग रचना
सदस्य संख्या - १६५
एका प्रभागाची लोकसंख्या - सरासरी ८४ हजार. कमीत कमी ७५ हजार तर जास्तीत जास्त २२ हजार.


निवडणुकीच्या कामासाठी २० कर्मचाऱ्यांची नियुक्ती

महापालिका आयुक्तांनी प्रभाग रचना तयार करून ती निवडणूक आयोगाच्या समोर मान्यतेसाठी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रभाग रचना कामासाठी २० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात अभियंते, टंकलेखक, लिपिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Web Title: pune mahanagar palika election 2025 Because politics: 'Aspirants' will be hit in the municipality due to changes in population and member numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.