Accident : नियंत्रण सुटून मोटार टेम्पोला धडकल्याने गोव्याचे दोन ठार; लोणावळ्यातील लायन्स पॉइंट परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 18:25 IST2025-12-06T18:24:49+5:302025-12-06T18:25:15+5:30
अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी मोटारीमधील जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही जागीच ठार झाल्याचे आढळले.

Accident : नियंत्रण सुटून मोटार टेम्पोला धडकल्याने गोव्याचे दोन ठार; लोणावळ्यातील लायन्स पॉइंट परिसरातील घटना
लोणावळा : उतारावरून नियंत्रण सुटून मोटार टेम्पोला धडकल्याने गोव्यातील म्हापसा येथील दोघेजण ठार झाले. लोणावळ्यातील लायन्स पॉइंट येथे शनिवारी (दि. ६) पहाटे हा अपघात झाला, यात टेम्पोचालक जखमी झाला आहे. योगेश सुतार व मयूर वेंगुर्लेकर (दोघेही रा. म्हापसा, गोवा) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याहून दोघे पर्यटक मोटारीने सहलीसाठी लोणावळा परिसरात आले होते. लायन्स पॉइंट परिसरात घाटमाथ्यावरून खाली उतरताना मोटारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटार भरधाव वेगात समोरून येणाऱ्या टेम्पोला जाऊन धडकली. धडक एवढी भीषण होती की, मोटारीच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी मोटारीमधील जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही जागीच ठार झाल्याचे आढळले.
अपघातस्थळावर गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. घटनास्थळी पोलिस पथकाने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवले.
या रस्त्यावर मोठ्या वाहनांची गर्दी वाढत असून, वाहनांचा वेग आणि खबरदारीचा अभाव यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याची स्थानिकांचे म्हणणे आहे, लायन्स पॉइंट परिसरात पर्यटकांची मोठी वर्दळ असते, अशा ठिकाणी वेगमर्यादा, सीसीटीव्ही आदी सुरक्षाव्यवस्थेची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे मत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.