बिबट्या आला रे..! पुरंदरच्या उदाचीवाडीमध्ये बिबट्याच्या दर्शनाने शेतकऱ्यांमध्ये घबराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 13:28 IST2025-11-27T13:26:51+5:302025-11-27T13:28:26+5:30
भोर, पुरंदरच्या विविध भागांत बिबट्यांचा उपद्रव; शेतकऱ्यांमध्ये घबराट; बिबट मानवी वस्तीत येऊन पाळीव प्राणी, भटक्या कुत्र्यांवरील हल्ल्यात वाढ

बिबट्या आला रे..! पुरंदरच्या उदाचीवाडीमध्ये बिबट्याच्या दर्शनाने शेतकऱ्यांमध्ये घबराट
सासवड :पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणावर वावर वाढत आहे आणि पुरंदर तालुक्याच्या विविध भागांत बिबट्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. सासवड वनक्षेत्रातील मौजे मांढर, परिचे, कोडीत बु, वाल्हा, आडाचीवाडी, सुकलवाडी, जेजुरी, मांडकी, झेंडेवाडी, नारायणपूर व उदाचीवाडी या गावांमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे बिबट मानवी वस्तीत येणे, बिबटमार्फत पाळीव प्राणी व भटके कुत्र्यांवर हल्ले होणे, तसेच शेती करताना शेतकऱ्यांना बिबट दिसणे आणि औद्योगिक क्षेत्रातही बिबट्यांचा वाढता वावर अशा घटनांमध्ये अलीकडील काळात वाढ झाली आहे.
उदाचीवाडी (ता. पुरंदर) येथील डोंगर भागात नुकताच एका शेतकऱ्याला बिबट दिसला असून, याची माहिती समजताच परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
पुरंदर तालुक्यात बिबट्यांचा उपद्रव नवीन नाही. पूर्वीही अनेक ठिकाणी प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना घडत होत्या. काही वर्षांपूर्वी किल्ले पुरंदर परिसरातील काळदरी, पानवडी देवडी, केतकावळे, पिंगोरी आणि इतर भागांमध्ये जंगली प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर होता.
शिकारीच्या निमित्ताने अस्तित्व लक्षात आले. बिबटघांचे मात्र, नंतर प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली. बिबट्याच्या भीतीने वन्यप्राणी आपले निवासस्थान बदलत बोपगाव, सोनोरी, दिवे, वनपुरी, उदाचीवाडी अशा भागांत स्थलांतरित झाले. त्यामुळे त्या परिसरात बिबट्यांचा देखील वावर वाढला आहे. परिणामी नागरिक भयभीत झाले आहेत.
एकूण ५ पिंजरे भेट
मानवी वस्तीत शिरलेला बिबट पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आवश्यक असलेल्या बिबट पिंजऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याने, जेजुरी येथील किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजकडून त्यांच्या सामाजिक जबाबदारी निधीमधून एकूण ५ बिबट पिंजरे सासवड वनपरिक्षेत्र कार्यालयास पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी बिबट पकडण्यासाठी लागणारा एक पिंजरा किलॉस्कर फेरस इंडस्ट्रीज, जेजुरी यांच्यामार्फत वनपरिक्षेत्र कार्यालय, सासवड येथे दिला गेला आहे. हा कार्यक्रम उपवनसंरक्षक महादेव मोहिते, शीतल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले, वनपाल गणेश पवार, राहुल रासकर, दीपाली शिंदे, जेजुरी कार्यालयीन कर्मचारी आणि किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज, जेजुरीकडून पी. सत्यमूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.रेजी के., जब्बार पठाण, प्रवीण पवार, सागर झोपे, सूरज भोईटे उपस्थित होते.
साडेचार वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ला
राजगुरुनगर: निमगाव खंडोबा (ता.खेड) येथे एका साडेचार वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले. या चिमुकल्याचे नाव देवांश योगेश गव्हाणे आहे. निमगाव येथील भगतवस्ती येथे दि. २५ रोजी रात्री ८:०० वाजता घराबाहेर खेळत असताना देवांश गव्हाणे यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि मानेला धरून शंभर फूट फरफटत नेले.
डेरे गावच्या परिसरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांत भीती
महुडे: भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्यातील डेरे (ता. भोर) गावातल्या ईनामाच्या ओल्याजवळ रात्री भटकणारा बिबट्या रस्त्यावर बसला होता. डेरे गावातील पुण्यात राहणारे कुटुंब भात शेतीचे काम करून पुण्याकडे जात होते. ते रात्री साडेसातच्या सुमारास फिरताना दिसले. या वेळी जयवंत अंबे यांच्या चारचाकी वाहनाला बिबट्याने धडक दिल्यामुळे या भागात, गावात भीतीचे माहोल निर्माण झाला आहे, अशी माहिती गावातील शरद डोंबे यांनी दिली. सदर कुटुंब पुण्यात जाऊन डोंबे यांनी त्यांची माहिती घेत विचारपूस केली आहे. डेरे परिसरातील नागरिकांनी भयभीत होऊ नये व संध्याकाळच्या वेळेत फिरताना भ्रमध्वनीवर गाणी वाजवत, हातात काठी घेऊन, सोबतीला कोणी असल्याशिवाय फिरू नये, असे वनविभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
बंदोबस्त करावा
पुरंदर तालुक्यात झेंडेवाडी, दिवे, सोनोरी, पूर्व भागातील चनपुरी, उदाचीवाडी आणि गुरोळी या भागांत बिबट्यांचे नियमित वास्तव्य आहे. सध्या विजेचे भारनियमन असून, रात्री वीज असल्याने शेतात आताना जीवालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. वनविभागाने पिंजरे लावून बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.