पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : तरुणाईच्या सर्जनशीलतेचे व्यासपीठ : डॉ. जब्बार पटेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 10:51 IST2026-01-09T10:51:26+5:302026-01-09T10:51:40+5:30
हेच या महोत्सवाचे खरे यश असल्याचे प्रतिपादन पिफचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी केले.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : तरुणाईच्या सर्जनशीलतेचे व्यासपीठ : डॉ. जब्बार पटेल
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने (पिफ) देश-विदेशांतील दर्जेदार चित्रपटांचे अवकाश खुले करण्याबरोबरच भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांशी पुणेकरांचा संवाद घडवून आणला आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण आणि दुर्गम भागातील तरुणांना विचार मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. गेल्या सात-आठ वर्षांत पिफच्या मराठी चित्रपट स्पर्धा विभागात दुर्गम भागातील तरुणांनी उपलब्ध साधनसामग्रीच्या आधारे तयार केलेल्या चित्रपटांना प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळाली आहेत. हेच या महोत्सवाचे खरे यश असल्याचे प्रतिपादन पिफचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी केले.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढील वर्षी रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. हा केवळ चित्रपट महोत्सव नसून, तरुणाईला कलेच्या माध्यमातून स्वतःचा संघर्ष आणि विचार मांडण्याची प्रेरणा देणारे व्यासपीठ असल्याचेही डॉ. पटेल यांनी सांगितले.
पुण्याच्या सांस्कृतिक नगरीत प्रस्थापित झालेल्या आणि चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या पिफला येत्या १५ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या निमित्ताने डॉ. जब्बार पटेल यांनी ‘लोकमत’ला भेट देऊन महोत्सवाच्या २४ वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला. मागील वर्षी ‘पोटरा’ हा चित्रपट विशेष लक्षात राहिल्याचे त्यांनी सांगितले. मोहोळ येथील तरुणाने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात पाल्यातील डोक्यावर देव घेऊन भीक मागणाऱ्या समाजजीवनाचे वास्तव मांडण्यात आले आहे. यातील पंधरा वर्षांच्या मुलीच्या भूमिकेतील अभिनय विशेष ठरला. शहाणपणाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मुलीकडे पाहण्याचा पुरुषी दृष्टिकोन कसा बदलतो, हे चित्रपटाचे कथानक आहे. चित्रपटासाठी स्थानिक मुलीचीच निवड करून साकारलेल्या या भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय परीक्षकांनी तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला. त्यानंतर सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी त्या मुलीला घर बांधून दिल्याची आठवण डॉ. पटेल यांनी सांगितली.
तरुणाईला अधिकाधिक वाव देणे हाच महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या समाजमाध्यमांवर गोव्यापेक्षा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील चित्रपट अधिक दर्जेदार असल्याची चर्चाही सुरू असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
युद्धाच्या सावटात मिळालेला सन्मान
रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात युक्रेनमधील एका तरुण दिग्दर्शकाला पिफमध्ये उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला होता. युद्धामुळे तो उपस्थित राहू शकला नाही. व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्याशी संवाद साधण्यात आला. सर्वत्र कर्फ्यू असतानाही त्याने पुरस्काराबद्दल आभार मानले. त्या क्षणी उपस्थितांचे मन हेलावून गेले, अशी आठवण डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितली.