पुण्यात गॅस टंचाईचा फटका; लग्नसमारंभ धार्मिक विधींचे आयोजन धोक्यात, चूल वापरण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 11:00 IST2026-03-14T11:00:01+5:302026-03-14T11:00:17+5:30
येत्या आठवडाभरात स्थिती सुधारली नाही, तर लग्नसोहळ्याची पंगत होऊ शकणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

पुण्यात गॅस टंचाईचा फटका; लग्नसमारंभ धार्मिक विधींचे आयोजन धोक्यात, चूल वापरण्याची वेळ
पुणे: सध्या लग्नसराई सुरू आहे. लग्नसराईत मंगल कार्यालये, लॉन्स हाऊसफुल्ल आहेत, तर केटरिंग व्यावसायिकांकडेही साखरपुडा, हळदी समारंभ, मेंदी समारंभ, लग्नसोहळ्याची भोजन व्यवस्थेची कामे आहेत. पण, व्यावसायिक गॅसपुरवठ्यावर झालेल्या परिणामाचा फटका केटरिंग व्यवसायाला चांगला बसल्याचे दिसून येत आहे. लग्नसोहळ्यातील जेवणासाठी व्यावसायिकांवर काटकसर करून गॅस वापरण्याची वेळ आली आहे. येत्या आठवडाभरात स्थिती सुधारली नाही, तर लग्नसोहळ्याची पंगत होऊ शकणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
लग्नसमारंभासाठी (दि. १३ व १४ मार्च) या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे आणि धार्मिक विधीच्या तारखा आहेत. मात्र, गॅस सिलिंडर मिळण्यात अडचणी येत असल्यामुळे लग्न आयोजक, पुजारी आणि केटरिंग व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. शहरातील अनेक भागांमध्ये गॅस वितरकांकडे सिलिंडरचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लग्नसमारंभासाठी जेवणाची तयारी करणाऱ्या केटरिंग व्यावसायिकांना वेळेवर स्वयंपाक करणे कठीण होत आहे. काही ठिकाणी पर्यायी इंधनाचा वापर करावा लागत असल्याचेही दिसून येत आहे.
केटरिंग व्यावसायिकांची चिंता
लग्नसमारंभामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर लागतात. गॅस उपलब्ध नसल्यामुळे केटरिंग व्यावसायिकांना अतिरिक्त खर्च करून पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. त्यामुळे खर्च वाढत आहे, तर परराज्यातील कामगार असल्याने त्यांचा पगार तर द्यावा लागत आहे. याचा भुर्दंड सोसावा लागत आहे, तर काही कामगारांना सुट्टी देण्यात आली आहे. या गॅस टंचाईमुळे चिंता वाढली आहे.
गॅस सिलिंडर टंचाईमुळे लग्नासह इतर धार्मिक विधींमध्ये होम-हवन आणि इतर पूजाविधीलाही फटका बसला आहे. धार्मिक कार्यक्रम पुढे ढकलेले जात आहेत, तर काही लोकांनी कार्यक्रम करण्यात नकार दिला आहे.- नकुल जोशी, पुजारी, धनकवडी
गॅसच्या तुटवड्यामुळे पुण्यातील केटरिंग व्यावसायिक लग्नसराईत काटकसर करून गॅसचा वापर करीत आहेत, तर काही वेळा गॅस शेगडी, लाकूड, भट्टीचा वापर करण्याची वेळ आली आहे, तर लग्नासाठी केटरिंगसाठीचे आगाऊ बुकिंगही व्यावसायिकांनी बंद केले आहे.- बाळासाहेब झांबरे, मुकुंदनगर, झांबरे पॅलेस