Pune Ganpati Festival : गणेशोत्सवात ध्वनिमर्यादा ओलांडणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 17:54 IST2025-09-02T17:54:49+5:302025-09-02T17:54:57+5:30
ध्वनिप्रदूषणाविरोधात जनजागृतीसाठी मंडळांच्या आवारात माहिती फलक लावले गेले असून, ३०० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन तपासणी पथकांमध्ये सामील

Pune Ganpati Festival : गणेशोत्सवात ध्वनिमर्यादा ओलांडणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार
पुणे : गणेशोत्सवात काही वर्षांपासून ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) या समस्येला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या आदेशानुसार पुणे शहर व उपनगरांतील सुमारे २०० निवडक गणेश मंडळांमध्ये पहिल्या दिवसापासून ध्वनी पातळीची मोजणी सुरू केली असून, शेवटच्या अकराव्या दिवसापर्यंत सुरू राहणार आहे.
ध्वनिप्रदूषणाविरोधात जनजागृतीसाठी मंडळांच्या आवारात माहिती फलक लावले गेले असून, ३०० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन तपासणी पथकांमध्ये सामील केले आहे. हे पथक दररोज सायंकाळनंतर आवाजाची पातळी मोजून अहवाल तयार करेल. गणेशोत्सवात जनजागृती, आवाजाची मोजणी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई अशा तीन स्तरावर ‘एमपीसीबी’ काम करत आहे. नागरिकांनी आणि मंडळांनी ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे.
ध्वनी मर्यादेचे नियम व कायदेशीर तरतुदी
डेसिबल मर्यादा :
दिवसा : (सकाळी ६:०० ते रात्री १०:००)
निवासी भाग : ५५ डेसिबल
व्यावसायिक भाग : ६५ डेसिबल
औद्योगिक भाग : ७५ डेसिबल
शांतता क्षेत्र (रुग्णालये, शाळा, न्यायालये) : ५० डेसिबल
रात्री (रात्री १०:०० ते पहाटे ६:००) :
निवासी भाग : ४५ डेसिबल
व्यावसायिक भाग : ५५ डेसिबल
औद्योगिक भाग : ७० डेसिबल
शांतता क्षेत्र : ४० डेसिबल
कायदेशीर तरतूद व शिक्षा : भारतीय दंड संहिता कलम २६८, २९० अंतर्गत सार्वजनिक त्रास दिल्यास गुन्हा दाखल होतो. पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ व ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० अंतर्गत कारवाई केली जाते. नियमभंग करणाऱ्यांवर दंड आकारणी, उपकरण जप्ती व गुन्हा नोंदणी होऊ शकते. दंडाची रक्कम १०,००० रुपये ते १ लाख रुपये इतकी असू शकते, तसेच शिक्षा म्हणून ५ वर्षांपर्यंत कैद होऊ शकते.