Pune Ganpati Festival : वादकांकडून पत्रकार महिलेचा विनयभंग; सहकारी पत्रकाराला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 20:51 IST2025-09-07T20:51:27+5:302025-09-07T20:51:38+5:30
संबंधित महिला पत्रकार आणि त्यांचा सहकारी वार्तांकनासाठी तेथे उपस्थित होते. त्यावेळी त्रिताल पथकातील काही सदस्यांनी महिलेच्या मार्गात अडथळा आणला.

Pune Ganpati Festival : वादकांकडून पत्रकार महिलेचा विनयभंग; सहकारी पत्रकाराला मारहाण
पुणे : ढोल-ताशा पथकातील वादकाने एका महिला पत्रकाराशी अश्लील वर्तन केले. तसेच, तिच्या सहकारी पत्रकाराला मारहाण देखील केली. यात तो रस्त्यावर पडला, त्याचा चष्मा तुटला. संबंधित महिला पत्रकाराने फरासखाना पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून, पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष याकडे वेधले.
ही घटना शनिवारी सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात घडली. संबंधित महिला पत्रकार आणि त्यांचा सहकारी वार्तांकनासाठी तेथे उपस्थित होते. त्यावेळी त्रिताल पथकातील काही सदस्यांनी महिलेच्या मार्गात अडथळा आणला. त्यानंतर त्यांच्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. महिलेने विरोध केला असता, त्यांना धमकावण्यात आले. तसेच त्यांच्या सहकऱ्याला रस्त्यावर पाडून मारहाण केली. ही घटना घडल्यानंतर महिला पत्रकाराने जवळच उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला घटनेची माहिती दिली. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांच्या ११२ हेल्पलाइनवर संपर्क साधून पोलिसांची मदत मागितली. थोड्यावेळाने त्यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली. मात्र, पोलिसांचा संपूर्ण फौजफाटा विसर्जन मिरवणूक बंदोबस्तात व्यग्र असल्याने तक्रार अर्जावर कार्यवाही झाली नव्हती.
छायाचित्रकारांना धक्काबुक्की...
लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीच्या वार्तांकनासाठी, फोटो काढण्यासाठी गेलेल्या छायाचित्रकारांना ताल ढोल-ताशा पथकातील वादकांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली. फोटो काढण्यास मनाई करून रस्त्यावर बाजूला होण्यास भाग पाडले.
बेलबाग चौक येथे टिळक पुतळ्याकडून येणारे जिलब्या मारुती मंडळ मिरवणुकीसाठी मार्गस्थ होत असताना, शिवाजी रस्त्याचे मुठेश्वर मंडळ पुढे आले. त्यावेळी दोन्ही मंडळांच्या ढोल-ताशा पथकातील सदस्यांत पुढे जाण्यावरून हाणामारी झाली. मंडळ कार्यकर्ते आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांच्यातील वाद मिटवला.