शहरात दोन ठिकाणी आगीच्या घटना; जीवितहानी टळली, अग्निशमन दलाची तत्काळ कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 10:08 IST2025-04-23T10:07:45+5:302025-04-23T10:08:12+5:30
पहिली घटना पुण्यातील प्रसिद्ध श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराजवळ घडली.

शहरात दोन ठिकाणी आगीच्या घटना; जीवितहानी टळली, अग्निशमन दलाची तत्काळ कारवाई
पुणे - पुण्यात आज पहाटे दोन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या असून सुदैवाने दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पहिली घटना पुण्यातील प्रसिद्ध श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराजवळ घडली.
अधिकच्या माहितीनुसार, रात्री १.०६ वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळताच तत्काळ १० अग्निशमन वाहने, ५ अधिकारी आणि ५० जवान घटनास्थळी रवाना झाले. मंदिराशेजारी असणाऱ्या एका दुमजली लाकडी वाड्याला भीषण आग लागली असून खाली असलेल्या दोन दुकानांनाही या आगीत नुकसान झाले आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांनी चारही बाजूंनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवला. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वेळीच ८-१० नागरिक बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिस आणि महावितरणचे कर्मचारीही घटनास्थळी हजर आहेत.
तर दुसरी घटना चंदननगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टी परिसरात पहाटे ५ वाजता घडली. येथे लागलेल्या भीषण आगीत जवळपास ५० हून अधिक झोपड्या भस्मसात झाल्या असून १० पेक्षा अधिक गॅस सिलेंडर फुटल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या १५ गाड्या आणि अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली ८० जवानांनी आग आटोक्यात आणली. घटनास्थळी १०० हून अधिक सिलेंडर्स बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेतही कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दोन्ही ठिकाणी आग नियंत्रणात असून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाकडून पुढील तपास व मदतकार्य सुरू आहे.