अग्निशामक दलाच्या इमारती सज्ज; पण मनुष्यबळ, साधन सामग्रीचे काय ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 11:56 IST2025-03-16T11:55:55+5:302025-03-16T11:56:28+5:30
आगीच्या घटना राेखण्याचे आव्हान ; पाच केंद्रांच्या इमारती वापरात येण्याची प्रतीक्षाच

अग्निशामक दलाच्या इमारती सज्ज; पण मनुष्यबळ, साधन सामग्रीचे काय ?
- हिरा सरवदे
पुणे - शहरात पाच ठिकाणी अग्निशामक केंद्रासाठी इमारती बांधून तयार आहेत; मात्र मनुष्यबळ आणि साधनसामुग्रीच्या कमतरतेमुळे ही केंद्रं वापराविना पडून आहेत. त्यामुळे विविध आपत्ती व संकटाच्या काळात नागरिकांच्या रक्षणासाठी धावून जाणाऱ्या अग्निशामक दलाची मनुष्यबळ व साधनसामुग्रीची प्रतीक्षा संपणार कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.
आग, पूर, झाडपडी, भिंतपडी, इमारत कोसळणे, इमारतीमध्ये किंवा लिफ्टमध्ये कोणी अडकणे, अशा विविध आपत्ती किंवा संकटाच्या काळात नागरिकांसह प्राणी, पक्ष्यांच्या मदतीसाठी महापालिकेने अग्निशामक विभाग निर्माण केला आहे. या विभागाचे मुख्य कार्यालय भवानीपेठ येथे असून, शहरात विविध २० ठिकाणी अग्निशामक केंद्रं आहेत. शहराचा विचार करता नागरिकांची सुरक्षा राखण्याच्या दृष्टीने किमान ७२ अग्निशमन केंद्रांची गरज आहे. प्रत्यक्षात अग्निशामक केंद्रांची संख्या आणि अग्निशामक दलाचे मनुष्यबळ दोन्हींचीही वाढ झालेली नाही.
जवळपास ४५० जागा रिक्त
नवीन भरती तर सोडाच, पण अग्निशामक दलाच्या मंजूर पदांपैकी जवळपास ४५० जागा रिक्त आहेत. यामध्ये अधिकाऱ्यांसह फायरमन, तांडेल व चालक या पदांचाही समावेश आहे. अनेकवेळा कंत्राटी चालक दिले जातात. त्यांना 'फायर इंजिन' चालविता येत नाही. यामुळे दलाच्या जवानांवरील ताण कमी होण्याऐवजी वाढतच जातो. तसेच सध्या अग्निशामक दलात प्रत्येक केंद्रांसाठी एक या प्रमाणे २० अग्निशमन गाड्या आहेत, मुख्य कार्यालयात भवानी पेठेत ४ अग्निशमन गाड्या आहेत. पाण्याचे टँकर केवळ चार आहेत. त्यातील एक टँकर मुख्य कार्यालयात आणि कोंढवा, एरंडवणा, येरवडा येथे प्रत्येकी एक टँकर ठेवण्यात आला आहे. तसेच ४ रुग्णवाहिका आहेत.
चांदणी चौक, नऱ्हे, खराडी, बाणेर, काळेपडळ केंद्र कागदावरच
शहरात सध्या २० ठिकाणी अग्निशामक केंद्रं कार्यरत आहेत. शहराचा वाढता विस्तार विचारात घेऊन महापालिकेने चांदणी चौक, नऱ्हे, खराडी, बाणेर व काळे पडळ अशा पाच ठिकाणी अग्निशामक केंद्रासाठी इमारती बांधून तयार आहेत. चांदणी चौक, नऱ्हे व खराडी येथील कामे पूर्ण झाली आहेत. इतर दोन ठिकाणी किरकोळ कामे बाकी आहेत; मात्र आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामुग्री, वाहने नसल्याने ही केंद्रं सुरू केली जात नाहीत. चांदणी चौक येथील केंद्र केवळ नावावरून मतभेद असल्याने सुरू होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
अग्निशामक दलास या गाड्यांची प्रतीक्षाच -
- रेग्युलर फायर इंजिन गाड्या (अग्निशमन वाहने) - ६
- गल्लीबाेळांत जाण्यासाठी लहान फायर इंजिन गाडी - १
- हायराईट फायर फायटिंग वाहन - ५
अग्निशामक दलातील रिक्त पदे -
- २४ अधिकारी
- १५० फायरमन
- १५० चालक व ऑपरेटर
इमारती ताब्यात घेण्यासाठी पत्रव्यवहार
महापालिकेच्या भवन विभागाने शहरात पाच ठिकाणी अग्निशामक केंद्रांचे बांधकाम केले आहे. यातील काम पूर्ण झालेल्या इमारती ताब्यात घेण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून अग्निशामक विभागाकडे पत्रव्यवहार सुरू आहे; मात्र समोरून काहीच प्रतिसाद मिळत नाही, असे सूत्रांनी सांगितले.