भोर तालुक्यातील दीडघर येथे घरातील गॅसच्या टाकीचा स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 19:36 IST2025-12-03T19:36:05+5:302025-12-03T19:36:45+5:30
आग लागल्याचे लक्षात येताच शेजारी व ग्रामस्थांनी तत्परतेने धाव घेतली व जवळील घरातून उपलब्ध पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

भोर तालुक्यातील दीडघर येथे घरातील गॅसच्या टाकीचा स्फोट
नसरापूर : भोर तालुक्यातील दीडघर येथे दिनेश काशीनाथ बांदल व यमुना रघुनाथ बांदल यांच्या घराला दुपारी लागलेल्या भीषण आग लागून संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी आल्याने घरातील सर्व संसारपयोगी साहित्य, शेती साहित्य, शेतातील धान्य,तांदूळ व रोख रक्कम, ५५ ग्रॅम सोने जळून खाक झाले. घरगुती गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे ही आग लागली, घटनास्थळी घरातील घरगुती गॅसची फुटलेली टाकी आढळून आली.आग लागल्याचे लक्षात येताच शेजारी व ग्रामस्थांनी तत्परतेने धाव घेतली व जवळील घरातून उपलब्ध पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
काही क्षणातच या आगीने विक्राळ रूप धारण केले आणि किचनमधून संपूर्ण घरात धूर व ज्वाळांनी तांडव पसरला. आग विझवण्या करीता दीडघर गावातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ तत्परता दाखवत या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु ही आग इतकी भिषण व भयंकर होती की या आगीमध्ये महत्त्वाचे घरगुती साहित्य पूर्णतः नष्ट झाले, घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या आगीचा पंचनामा नसरापूर मंडल अधिकारी प्रदीप जावळे, गावकामगार तलाठी नलावडे यांनी केला आहे. सदर प्रकरणी पंचनामा करून वरिष्ठांना प्रथम अहवाल पाठविला जाईल, आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये दिनेश काशीनाथ बांदल व यमुना रघुनाथ बांदल यांचे घराचे प्रचंड नुकसान झाले, ही आग विझवण्यासाठी वेळीच पुण्याहून अग्निशामक दल आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात ग्रामस्थांना यश आले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र, या आगीमुळे दीडघर गावावर चिंतेचे सावट पसरले आहे.पंचनाम्याप्रसंगी महिला पोलीस पाटील नीता राजेश सोंडकर, सचिन बांदल व मित्रपरिवार, अरविंद सोंडकर आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.