गॅसची साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 11:23 IST2026-03-11T11:23:23+5:302026-03-11T11:23:50+5:30

अनेक ठिकाणी साठेबाजी व काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत

Pune District Magistrate warns of strict action against those involved in gas hoarding and black marketing | गॅसची साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

गॅसची साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

पुणे : शहर आणि जिल्ह्यात घरगुती गॅसच्या तुटवड्यानंतर साठेबाजी तसेच काळाबाजार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अशाप्रकारे साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या एजन्सी तसेच वितरकांवर धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शहर व पिंपरी मिळून तीन पथके तर ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्यात एक पथक नेमण्यात आले आहे. तर जिल्हास्तरावर तसेच शहर स्तरावर स्वतंत्र दक्षता पथक नेमण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र टुडे यांनी दिली. साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

हॉटेल तसेच रेस्टॉरंट चालवणाऱ्यांना व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी या हॉटेलमधून घरगुती गॅसचा वापर सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे घरगुती गॅस वापरणाऱ्यांना बुकिंगसाठी त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी साठेबाजी व काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य पुरवठा अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन जिल्ह्यातील गॅस पुरवठ्यावर तसेच साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

पुणे शहर, पिंपरी व जिल्ह्यात धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार शहर व पिंपरी मिळून तीन पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात तीन विभागीय अधिकारी व दोन पुरवठा निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. तर ग्रामीण भागात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पथक नेमण्यात आले आहे. यात पुरवठा निरीक्षण अधिकारी, पोलिस निरीक्षक तसेच संबंधित कंपन्यांचे क्षेत्रीय अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आलेल्या तक्रारीनुसार अचानक तपासणी व धाडी टाकून घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्याची कारवाई करण्याचे निर्देश डुडी यांनी दिले आहेत. याचा सविस्तर अहवालही जिल्हा प्रशासनाला द्यावा, असेही सुचविण्यात आले आहे.

शहर व जिल्ह्यात अशा स्वरूपाच्या घटना आढळल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही सुरू आहे. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

Web Title : गैस जमाखोरी, कालाबाजारी करने वालों पर होगी सख्त कार्रवाई: पुणे कलेक्टर की चेतावनी

Web Summary : पुणे में गैस की कमी के बाद जमाखोरी और कालाबाजारी पर प्रशासन सख्त। एजेंसियों, वितरकों पर छापे। कलेक्टर ने सख्त कार्रवाई की चेतावनी दी, वाणिज्यिक प्रतिष्ठानों द्वारा घरेलू गैस के दुरुपयोग पर चिंता जताई।

Web Title : Pune Collector Warns Against Gas Hoarding, Black Marketing; Strict Actions Promised

Web Summary : Pune administration cracks down on gas hoarding and black marketing following shortages. Teams are formed to conduct raids on agencies and distributors. Collector warns of strict action against offenders, addressing concerns over domestic gas misuse by commercial establishments.