लग्न सोहळ्यात पुणे जिल्हा शिवसेना अध्यक्षांनी पुतण्या व पुतणीवर पिस्तुल रोखून धमकावले; नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:09 IST2025-05-27T15:09:04+5:302025-05-27T15:09:41+5:30
- आमदार विजय शिवतारे यांचे दोघे जवळचे नातेवाईक; ऐन लग्न सोहळ्यात दोन गटांमध्ये अंगावर जाऊन मारहाण

लग्न सोहळ्यात पुणे जिल्हा शिवसेना अध्यक्षांनी पुतण्या व पुतणीवर पिस्तुल रोखून धमकावले; नेमकं कारण काय?
नीरा - पुणे जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष दिलीप सोपान यादव व चिरंजीव विनय यादव यांनी लग्नसोहळ्यात आपल्याच पुतण्या व पुतणीवर पिस्तुल रोखून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सासवड पोलीस स्टेशनमध्ये माजी राज्यमंत्री व पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांची पुतणी केतकी धनंजय झेंडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
सासवड पोलीस स्टेशनमध्ये दाखल फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. २४) रोजी सासवड-हडपसर रोडवरील महाराजा लॉन्समध्ये फिर्यादी झेंडे यांचे चुलत भाऊ प्रथमेश अजित यादव यांचा साखरपुडा होता. त्या कार्यक्रमाला सर्व कुटुंबीय हजर होते. त्यामध्ये दाजी सुनील धर्मराज कोलते, बहिण मालिनी कोलते, वहिनी सारिका यादव, निलेश यादव, योगेश यादव आदी नातेवाईक उपस्थित होते. याच कार्यक्रमात विनय यादव, दिलीप यादव, सुनीता यादव, शुभांगी दौंडकर, अक्षता यादव, भुजंग यादव, महेश यादव व इतरही उपस्थित होते.
फिर्यादी केतकी झेंडे यांचे चुलत भाऊ चिनू उर्फ संकेत यादव यांनी झेंडे यांच्या कुटुंबीयांना त्रास देण्याच्या हेतूने जवळ येत विचारले की, "तुम्ही १७ मे रोजी माझ्या लग्नाला दिलीप यादव यांचे कारण देऊन आला नाही, मग आज साखरपुड्याला कसे काय आलात?" या कारणावरून झेंडे यांचे दोघे भाऊ व चुलत भाऊ यांच्यात चिनू यादवसोबत किरकोळ बाचाबाची झाली. त्यावेळी चिनू तिथून निघून गेला.
यानंतर चिनूने दिलीप सोपान यादव यांच्या कुटुंबीयांच्या घोळक्यात प्रवेश केला व काही मिनिटांतच दिलीप सोपान यादव, विनय यादव, दिलीप यादव, सुनीता यादव, शुभांगी दौंडकर, अक्षता यादव, भुजंग यादव, महेश यादव व इतर झेंडे यांच्या भावांच्या अंगावर धावून आले. यामध्ये अक्षता यादव, सुनीता यादव, शुभांगी दौंडकर यांनी दोन्ही भावांच्या अंगावर जाऊन हाताने मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या गळ्यावर रक्त येईल असे वळ आले.
तसेच, या गोंधळात केतकी झेंडे मध्ये पडल्या असता, दिलीप यादव व विनय यादव यांनी त्यांना जोरात ढकलले. यादरम्यान झेंडे यांच्या गळ्यातील अंदाजे ३.३० ग्रॅम वजनाचा टेंपल हार गहाळ झाला. याच दरम्यान, दिलीप व विनय यादव यांनी कंबरेतील पिस्तुल काढून झेंडे व त्यांच्या भावांच्या अंगावर रोखून जिवे मारण्याची धमकी दिली. "पुन्हा सासवडमध्ये दिसलात तर बघा," अशी धमकी त्यांनी दिली.
या पूर्वीही यादववाडी येथे झेंडे यांचे भाऊ प्रसाद यादव व सागर यादव गेले असता, विनय व दिलीप यादव यांनी त्यांच्यावर पिस्तुल उगारून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद आहे. त्या घटनेवरूनही सासवड पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही फिर्याद केतकी धनंजय झेंडे (वय ४०, रा. कुबेरा विहार, बी विंग ५, फ्लॅट नं. ४०, हडपसर गाडीतळ, पुणे) यांनी दाखल केली आहे. पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप यादव यांनी आपल्या बहिणीवरच पिस्तुल रोखून धमकावत आहेत. यादव हे माजी राज्यमंत्री व पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचे चुलत मेव्हणे आहेत. तर फिर्यादी केतकी झेंडे या शिवतारे यांच्या सख्या भाची आहेत.
कुटुंबातील जुना वाद लग्नसमारंभात चव्हाट्यावर आल्याने, पुरंदर तालुक्यात "मुळशी पॅटर्न" तर होत नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे. शनिवारी (दि. २४) रोजी सासवड-हडपसर रोडवरील महाराजा लॉन्समध्ये दिलीप सोपान यादव व केतकी धनंजय झेंडे यांच्या कुटुंबीयांमध्ये झालेल्या वादाची फिर्याद झेंडे यांनी दिली असून, दिलीप यादव यांनीही फिर्याद दाखल केल्याचे सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले.