Pune Crime: मेसेज का पाठवतो ? तळजाई टेकडीवर प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणावर कोयत्याने वार; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 18:59 IST2025-11-01T18:57:56+5:302025-11-01T18:59:42+5:30
- पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहतीत महिलांमध्ये हाणामारीची घटना घडली. वादातून हाणामारी करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune Crime: मेसेज का पाठवतो ? तळजाई टेकडीवर प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणावर कोयत्याने वार; गुन्हा दाखल
पुणे : प्रेम प्रकरणाच्या संशयातून तरुणाला अडवून त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना तळजाई टेकडी परिसरात घडली. याप्रकरणी दोघांविरोधात सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रोहित दिलीप साळवे (२२, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साळवे याने याबाबत सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित एका कंपनीत डिलिव्हरी बाॅय म्हणून काम करतो. २८ ऑक्टोबर रोजी रोहितच्या मैत्रिणीने त्याच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला. रोहित आणि त्याची मैत्रीण दुचाकीवरून फिरायला बाहेर पडले.
तळजाई टेकडी परिसरातील सदू शिंदे स्टेडियमजवळ आरोपींनी दुचाकीस्वार रोहित आणि त्याच्या मैत्रिणीला अडवले. त्यावेळी एका आरोपीने ‘तू माझ्या बहिणीला मेसेज का पाठवतो’, अशी विचारणा केली. ‘तुझ्या बहिणीचे लग्न झाल्यापासून मी संबंध तोडले आहेत’, असे साळवेने आरोपीला सांगितले. त्यानंतर आरोपींनी साळवेशी वाद घालून त्याला शिवीगाळ केली. एका आरोपीने साळवेला पकडले. आरोपी बरोबर असलेल्या साथीदाराने साळवेच्या डाेक्यात कोयत्याने वार केला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाने ससून रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक फौजदार जोशी पुढील तपास करत आहेत.
जनता वसाहतीत महिलांमध्ये हाणामारी
पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहतीत महिलांमध्ये हाणामारीची घटना घडली. वादातून हाणामारी करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस शिपाई खराडे यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच महिला जनता वसाहतीत राहायला आहेत. जनता वसाहतीतील गल्ली क्रमांक ७१ च्या परिसरात ३० ऑक्टोबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास किरकोळ कारणावरून महिलांमध्ये वाद झाला. वादातून महिलांमध्ये हाणामारी झाली. रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकीला धक्का दिल्याने दुचाकीचे नुकसान झाले.
आरडओरडा, तसेच शिवीगाळ करून सार्वजनिक शांततेचा भंग करणे, मारामारी केल्याप्रकरणी पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे खराडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस हवालदार शिंदे करत आहेत.