Pune Crime : पहिलवान सागर मोहोळकरचा ससूनमध्ये उपचाराच्या दरम्यान मृत्यू (video)
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 09:45 IST2026-03-17T09:45:07+5:302026-03-17T09:45:19+5:30
- नीलेश घायवळवर केला होता हल्ला

Pune Crime : पहिलवान सागर मोहोळकरचा ससूनमध्ये उपचाराच्या दरम्यान मृत्यू (video)
पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्यावर भर कुस्तीच्या फडात हल्ला करून चर्चेत आलेला पहिलवान सागर मोहोळकर याचा ससून रुग्णालयात उपचाराच्या दरम्यान सोमवारी (दि. १६) मृत्यू झाला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या मोहोळकरवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचाराच्या दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. दोन आठवड्यांपूर्वी जामखेड परिसरात अज्ञात दुचाकीस्वारांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात सागर मोहोळकर गंभीर जखमी झाला होता.
त्याला तातडीने उपचारासाठी पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करून शरीरातून काही गोळ्या काढल्या होत्या. मात्र, शरीरात अजूनही काही गोळ्या अडकून असल्याची चर्चा होती. प्रकृती चिंताजनक असतानाच उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सागर मोहोळकर हा एप्रिल २०२५ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील आंदरूड येथील जत्रेतील कुस्तीच्या फडावर झालेल्या घटनेमुळे चर्चेत आला होता. त्या वेळी भर गर्दीत त्याने पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्यावर हल्ला करत मारहाण केली होती. या घटनेनंतर दोन्ही गटांमध्ये वैर अधिक तीव्र झाल्याचे सांगितले जाते.