बांगलादेशी महिलांना पुण्यात आणणारा “बाबू भैया” कोण ? बुधवार पेठेतील मोठं रॅकेट उघड
By किरण शिंदे | Updated: February 20, 2026 15:27 IST2026-02-20T15:26:09+5:302026-02-20T15:27:00+5:30
- पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत कारवाई करत २२ महिलांना ताब्यात घेतले होते.

बांगलादेशी महिलांना पुण्यात आणणारा “बाबू भैया” कोण ? बुधवार पेठेतील मोठं रॅकेट उघड
पुणे - पुण्यातील रेड लाइट एरिया अशी ओळख असलेला बुधवार पेठेचा परिसर सध्या पुणे पोलिसांच्या रडारवर आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करत मानवी तस्करीचं मोठं रॅकेट उघडकीस आणलं होतं. थेट बांगलादेशातून महिलांना पुण्यात आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचं उघडकीस आलं होतं. आणि या सर्वांचा मास्टरमाईंड 'बाबू भैया' उर्फ पापा शेख हा इसम असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं.
तीन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत कारवाई करत २२ महिलांना ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान त्यापैकी ११ महिला या बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले. या महिलांकडे बोगस आधार कार्ड आणि इतर बनावट कागदपत्रे आढळली. फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात तपास सुरू असताना बाबू भैया उर्फ पापा शेख याचं नाव समोर आलं. या बाबु भैयाचा संपर्क थेट बांगलादेश सीमेवरील दलालांशी असल्याचं समोर आलं. हा बाबू भैया बोगस आधार कार्ड तयार करून देणाऱ्या दलालांच्या माध्यमातून बांगलादेशी महिलांना कोलकाता मार्गे पुण्यात आणायचा. या महिलांना ब्युटी पार्लर किंवा शिलाईकामाचे आमिष दाखवून पुण्यात आणले जायचे. त्यानंतर जबरदस्तीने त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचा आरोप या बाबु भैयावर आहे.
या प्रकरणात पापा शेखसह सुमित्रा कांबळे, राजेश कलीमनी, रणजीत पात्रा आणि रूपा शेख यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही संपूर्ण टोळी संघटित पद्धतीने हे रॅकेट चालवत होती.
कोण आहे पापा शेख?
पापा शेख सुमारे २० वर्षांपूर्वी बुधवार पेठेतील एका हॉटेलमध्ये काम करायचा. काही वर्षात त्याने बुधवार पेठेत आपला जम बसवला. त्या भागातील अवैध धंद्यांची माहिती मिळवली आणि अवैध धंदे तो चालवू लागला. मागील काही वर्षात त्यांनी अवैध धंद्यातून मोठी कमाई केली असल्याचीही माहिती समोर आली आहे. बाबू भैया उर्फ पापा शेख याच्या तीन बायका असल्याचे समोर आले आहे.. यातील एक पत्नी बांगलादेशी आहे. त्याच्या तिन्ही बायका बुधवार पेठ परिसरात असून येथे त्यांचे चांगले प्रस्थ आहे. बुधवार पेठेत येणाऱ्या महिलांना त्याच्या बायका धमकवायच्या मारहाण करायच्या आणि तिथून बाहेर पडू देत नव्हत्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर बाबुभैया पापा शेख फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.