हे काय आश्रम आहे? औंध जिल्हा रुग्णालयातून जबरदस्ती डिस्चार्जनंतर तीनच दिवसात रुग्ण दगावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 17:22 IST2025-03-19T17:21:27+5:302025-03-19T17:22:24+5:30
डिस्चार्जवेळी मोरे यांचे नातेवाईक डॉक्टरांना त्यांना रुग्णालयातच ठेवण्याची विनंती करत होते. मात्र..

हे काय आश्रम आहे? औंध जिल्हा रुग्णालयातून जबरदस्ती डिस्चार्जनंतर तीनच दिवसात रुग्ण दगावला
- किरण शिंदे
पुणे - औंध जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या ४४ वर्षीय रुग्णाला हे काय आश्रम आहे का? असे म्हणत डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत त्याचा मृत्यू झाला. या धक्कादायक प्रकारानंतर रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गिरीश मोरे (वय ४४, रा. येरवडा) हे जुनाट व्यसनाधीनता, अनियंत्रित मधुमेह, क्रॉनिक पॅन्क्रिएटायटिस आणि न्युरोपॅथी या आजारांसाठी ३ जानेवारी २०२५ रोजी औंध जिल्हा रुग्णालयात भरती झाले होते. त्यांची प्रकृती पाहता त्यांना उपचारांची गरज होती. मात्र, १० जानेवारी रोजी त्यांना वैद्यकीय दृष्ट्या स्थिर असल्याचे सांगत डिस्चार्ज देण्यात आला.
यादरम्यान, डिस्चार्जवेळी मोरे यांचे नातेवाईक डॉक्टरांना त्यांना रुग्णालयातच ठेवण्याची विनंती करत होते. मात्र, डॉ. अमोल बोद्रे यांनी हे काय आश्रम आहे का ? असे म्हणत त्यांना रुग्णालयातून हाकलून दिले, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर युजर्सकडून संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यातील या व्हिडिओमुळेरुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, मोरे यांचा डिस्चार्ज झाल्यानंतर तीन दिवसांत मृत्यू झाला. यानंतर रुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेवर टीका होत आहे. डॉक्टरांचा संवाद आणि रुग्णालयाचा निर्णय योग्य होता का, याबाबत चौकशी सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणानंतर सरकारी रुग्णालयातील उपचारपद्धती, डॉक्टरांचा रुग्णांशी असलेला संवाद आणि प्रशासनाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. चौकशी समितीच्या अहवालानंतरच सत्य समोर येईल, पण तोपर्यंत या प्रकरणाने आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा उघड केल्या आहेत.