दारूच्या नशेत बेकाबू चालकाचा थरार; पोलिसांची तत्पर कारवाई, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:18 IST2026-04-08T13:17:08+5:302026-04-08T13:18:43+5:30
- या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दारूच्या नशेत बेकाबू चालकाचा थरार; पोलिसांची तत्पर कारवाई, व्हिडिओ व्हायरल
- किरण शिंदे
पुणे - पुण्यातील वारजे परिसरात मद्यधुंद चालकाने केलेल्या बेफाम वाहनचालनामुळे एक गंभीर आणि थरारक घटना घडली असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अधिकच्या माहितीनुसार, संबंधित चालक उत्तमनगरकडून वारजेकडे येत असताना अतिवेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवत होता. दारूच्या नशेत असलेल्या या चालकाने रस्त्यातील काही वाहनांना धडक दिल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत चालकाने थेट एका पोलिसालाच गाडीत ओढून नेण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकारामुळे उपस्थित नागरिक हादरले.
सुदैवाने, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. उत्तमनगर पोलिसांनी तातडीने हालचाल करत आरोपी चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर संतप्त झालेल्या पोलिसांनी त्याला रस्त्यावरच चोप दिल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे शहरात वाहतूक नियमांचे पालन आणि मद्यपान करून वाहन चालवण्याच्या वाढत्या प्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना जबाबदारीने वाहन चालवण्याचे आवाहन केले आहे.