Pune Crime: पुण्यातील ‘रेस्क्यू फाउंडेशन’मधून १३ बांगलादेशी मुलींचे थरारक पलायन; कर्मचाऱ्यांवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 18:04 IST2026-04-12T17:59:34+5:302026-04-12T18:04:50+5:30
Pune Crime - केअरटेकरला डांबून सुरक्षारक्षकावर हल्ला; २ मुली ताब्यात, ११ अद्याप फरार

Pune Crime: पुण्यातील ‘रेस्क्यू फाउंडेशन’मधून १३ बांगलादेशी मुलींचे थरारक पलायन; कर्मचाऱ्यांवर हल्ला
पुणे - पुण्यातील हडपसर परिसरातील महंमदवाडी रोडवर असलेल्या ‘रेस्क्यू फाउंडेशन’ या महिला संरक्षण गृहात रविवारी धक्कादायक घटना घडली. मानवी तस्करीतून मुक्त करण्यात आलेल्या १३ बांगलादेशी मुलींनी संस्थेतील कर्मचाऱ्यांवर हल्ला करून थरारक पद्धतीने पलायन केले. या घटनेमुळे महिला संरक्षण केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार अत्यंत नियोजनबद्ध होता. एका मुलीने औषधाची गरज असल्याचे सांगून केअरटेकर लक्ष्मी कांबळे यांना बोलावले. दरवाजा उघडताच इतर मुलींनी त्यांच्यावर झडप घालत त्यांना जबरदस्तीने वैद्यकीय कक्षात डांबले आणि बाहेरून कडी लावली.
या दरम्यान, साफसफाईच्या कामामुळे मुख्य प्रवेशद्वार उघडे राहिले. ही संधी साधून १३ मुली बाहेर पळाल्या. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षारक्षकावरही त्यांनी हल्ला केला, त्याला ओढत नेले आणि चावा घेत पळ काढला. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर हडपसर पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. सय्यदनगर परिसरातून १३ पैकी २ मुलींना ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित ११ मुलींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी अधिकृत एफआयआर नोंदवण्यात आलेला नसून केवळ ‘जी.डी.’ नोंद करण्यात आली आहे.
‘रेस्क्यू फाउंडेशन’ ही संस्था मानवी तस्करीतून मुक्त झालेल्या महिला व मुलींच्या पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार, १६ मार्च २०२४ पासून येथे असलेले पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले होते. याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप संस्थेने केला आहे.
मानसिक तणाव कारणीभूत?
संस्थेची क्षमता ओलांडून महिलांना ठेवण्यात आल्याने व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. बांगलादेशी नागरिक असलेल्या या मुलींच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया साधारण १ ते २ वर्षे चालते. या कालावधीत बंदिस्त राहिल्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
CCTV फुटेजमधून उलगडला थरार
घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याच्या आधारे फरार मुलींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बेपत्ता ११ मुलींचा शोध घेणे हे सध्या पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.